Advertisement

नीला सत्यनारायण यांचं ‘ऋण’ फेडणार ‘जजमेंट’!


नीला सत्यनारायण यांचं ‘ऋण’ फेडणार ‘जजमेंट’!
SHARES

प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांच्या कथा-कादंबऱ्यांवर सिनेमे बनवण्याचा मोह आजवर बऱ्याच दिग्दर्शकांना झाला आहे. नेहमीच आशयघन सिनेमांना प्राधान्य देणाऱ्या समीर सुर्वेलाही तो झाला आणि त्यानं ‘जजमेंट’ हा मराठी सिनेमा बनवला. नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला.


गप्पांचा रंगला फड

मुंबईतील कोहिनूर हाटेलमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात कलाकार-तंत्रज्ञांनी या सिनेमाच्या मेकिंग प्रसंगी घडलेली पडद्यामागील किस्से, गमतीजमती सांगितले. याशिवाय पडद्यामागे घडलेल्या काही गोष्टींचा व्हिडीओसुद्धा यावेळी लाँच करण्यात आला. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ कादंबरीवर आधारित आहे.


वेगळेपणाची अपेक्षा

समीरने यापूर्वी दिवंगत साहित्यिक व. पु. काळे यांच्या 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' आणि 'शुभ लग्न सावधान' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं 'जजमेंट' चित्रपटातही निश्चितच वेगळेपण असेल अशी आशा आहे. डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हर्षमोहन यांनी यापूर्वी अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पकडापकडी' या चित्रपटाची निर्मिती केली होती.


मराठीतील नामवंत कलाकार

'जजमेंट' चित्रपटासाठी गीतकार मंदार चोळकरने गाणी लिहिली असून, संगीत नवल शास्त्री यांनी दिलं आहे. या चित्रपटात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगारसोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा देशमुख आणि नुमायारा खान आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, जे. व्ही. पवार (दलित पॅंथर संस्थापक सदस्य, साहित्यिक), अर्जुन डांगळे (दलित पॅंथर सदस्य, साहित्यिक), ॲड. जयदेव गायकवाड (माजी आमदार, दलित पॅंथर सदस्य) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 'पँथर' या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा करत या सोहळ्यांची सांगता करण्यात आली, या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हर्षमोहन करणार आहेत.



हेही वाचा -

‘लोकल-व्हाया-दादर’च्या प्रेमात वरुण!

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा