मराठी सिनेमातलं नातं भावा बहिणीचं!

रूपेरी पडद्याला समाजमनाचा आरसा मानलं जातं. त्यामुळंच या आरशात बऱ्याचदा मानवी नातेसंबंधांचंही प्रतिबिंब उमटत असतं. या नात्यातील सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे भाऊ-बहिणीचं... मराठी सिनेमाच्या पटलावरही या नात्याचं प्रतिबिंब अगदी ठळकपणे उमटल्याचं पहायला मिळतं.

मराठी सिनेमातलं नातं भावा बहिणीचं!
SHARES

रूपेरी पडद्याला समाजमनाचा आरसा मानलं जातं. त्यामुळंच या आरशात बऱ्याचदा मानवी नातेसंबंधांचंही प्रतिबिंब उमटत असतं. या नात्यातील सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे भाऊ-बहिणीचं... मराठी सिनेमाच्या पटलावरही या नात्याचं प्रतिबिंब अगदी ठळकपणे उमटल्याचं पहायला मिळतं.

रिल लाईफमध्ये जे असतं ते सगळं खोटं असतं, पण इथलं एक नातं मात्र १०० टक्के खरं असतं. ते म्हणजे बहिण-भावाचं नातं. त्यामुळंच गानकोकीळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांनी ट्रॅजिडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांच्या मनगटावर बांधलेल्या राखीच्या रेशमी धाग्याचा उल्लेख सुरुवातीला करणं गरजेचं वाटतं. लतादीदी आणि दिलीप कुमार यांचं हे नातं संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी एक आगळं वेगळं उदाहरण असल्याचं मानलं जातं. याच वाटेनं जात नंतर बरेच कलाकार-तंत्रज्ञ भाऊ-बहिणीच्या या रेशमी बंधनात अडकले, पण मराठी चित्रपटांच्या पटलावर उमटलेलं हे नातं विविध पैलू मांडणारं ठरलं आहे...

दिलीप कुमार यांना लतादीदी राखी बांधत असल्याचं हे दुर्मिळ छायाचित्र ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्या संग्रहातून साभार...रक्षाबंधन किंवा भाऊबीज म्हटलं की 'सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती... ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया...' हे गाणं सहजपणे ओठांवर येतं. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भाऊबीज' या चित्रपटातील आशा भोसले यांच्या आवाजातील हे भाऊबीजेच्या सणाचं गाणं अजरामर झालं आहे. यासारख्या आणखी काही चित्रपटांनीही भाऊ-बहिणीचं रेशमी नातं अधोरेखित करत काळ कितीही बदलला तरी या नात्यातील गोडवा आचंद्रसूर्य अबाधित राहणारा असल्याचं ठासून सांगितलं आहे. रंगीत चित्रपटांच्या विश्वातील विजय कोंडके दिग्दर्शित 'माहेरची साडी' या चित्रपटात अलका कुबल आणि अजिंक्य देव यांनी साकारलेली भाऊ-बहिणीची भूमिका आणि 'भावासाठी धावा करते पाठीशी राही...' हे गाणं चांगलंच गाजलं, पण ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातही हे नातं रुपेरी पडद्यानं अधिक चांगल्याप्रकारे फुलवलं होतं हे विसरता येणार नाही.

१९७० मध्ये कृष्णधवल चित्रपटांच्या युगात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी 'धाकटी बहीण' या चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं एका वेगळ्या शैलीत सादर केलं होतं. या चित्रपटातील 'धागा जुळला, जीव फुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला...' हे गाणं रक्षाबंधनाच्या सणासाठी अगदी समर्पक आहे. या चित्रपटात अरुण सरनाईक यांनी साकारलेल्या भावाची रक्षाबंधनासाठी वाट पाहणारी बहिण आणि तिच्या मनात ओतप्रोत भरलेला भाव या गाण्यात पहायला मिळतो. सरनाईक यांच्यासोबत या चित्रपटात अनुपमा, कमलाकर टाकळकर, राजा मयेकर, हेलन यांच्या भूमिका आहेत. हे गाणं आशा भोसले यांनी गायलं असून, दिवंगत संगीतकार सुधीर फडके यांनी आपल्या खास शैलीत संगीतबद्ध केलेलं आहे.

या चित्रपटापूर्वीपासून भाऊ-बहिणीचं हे नातं मराठी चित्रपटांनी रसिकांसमोर आणलं आहे. 'ओवाळणी' हा १९५४ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं असून, कथा, पटकथा, संवादलेखन ग. दि. माडगूळकर यांनी केलं आहे. सुलोचना, राजा परांजपे, चित्रा, विवेक, इंदिरा चिटणीस, धुमाळ, बाळकोबा गोखले, आल्हाद अशी त्या काळातील आघाडीच्या कलाकारांची फळी या चित्रपटात आहे. पुढे २००२ मध्ये 'ओवाळणी' हेच शीर्षक असलेला चित्रपट दिग्दर्शक डॅा. बाबासाहेब पोवार यांनी अलका कुबल, राजशेखर, उषा नाईक, चेतन दळवी, अलग इनामदार आदी कलाकारांना घेऊन बनवला. या चित्रपटात त्यांनी सैन्य दलातील अधिकारी भाऊ आणि त्याच्या बहिणीची कथा मांडली.

१९५५ नंतर २००३ मध्ये पुन्हा एक 'भाऊबीज' प्रदर्शित झाला. ज्यात अशोक शिंदे, निशिगंधा वाड, अलका कुबल, सीमा देव, कुलदीप पवार अशी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात हिंदू-मुस्लीम लहान बहिण-भावाच्या प्रेमाची कथा पहायला मिळते. 'ओवाळणी' आणि 'भाऊबीज'प्रमाणे 'ओवाळीते भाऊराया' या शीर्षकाचेही दोन चित्रपट बनले आहेत. यापैकी १९७५ मध्ये बनलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केलं असून, रमेश देव, सीमा देव, रविराज, रुही, गणेश सोळंकी, नीलम, विवेक, मोहन कोठीवान, राजा नेणे, वत्सला देशमुख, मंदा देसाई, रवि आनंद आदी कलाकार आहेत. या चित्रपटातील 'ओवाळीते मी लाडक्या भाऊराया...' हे जगदीश खेबूडकर लिखित, प्रभाकर जोग संगीत दिग्दर्शित गाणं शुभांगी आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. २००७ मध्ये दिग्दर्शक सुभाष फडके यांनी पुन्हा 'ओवाळीते भाऊराया' याच शीर्षकाचा चित्रपट बनवला. यात सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी, प्रिया बेर्डे, स्मिता तळवलकर, तृप्ती भोईर, कुशल बद्रीके हे कलाकार आहेत.

'हाच सूनबाईचा भाऊ' हा पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित एव्हरग्रीन सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात नीना कुलकर्णी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या भाऊ-बहिणीची कहाणी प्रेक्षकांनी पाहिली. रेणुका शहाणेच्या पदार्पणाच्या या चित्रपटात मधुकर तोरडमल, मोहन जोशी, सुलभा देशपांडे, शमा देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. 'भाऊचा धक्का' असं शीर्षक असलेलाही एक मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. १९६२ मध्ये आलेल्या 'बायकोचा भाऊ'मध्ये दिग्दर्शक माधव भोईटे यांनी भावा-बहिणीच्या नात्यावर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून प्रकाश टाकला आहे. राजा परांजपे, रंजना (जुनी), सूर्यकांत, दादा साळवी, इंदिरा चिटणीस यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील 'आली दिवाळी...' हे गाणं लोकप्रिय आहे.

'रंगत संगत' या चित्रपटातही दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांनी भावा-बहिणीचं रेशमी नातं इमोशनची जोड देत खुलवलं आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या कौटुंबिक चित्रपटात अर्चना जोगळेकरनं कॅन्सरग्रस्त बहिणीची भूमिका साकारली असून, लक्ष्मीकांत बेर्डे तिचा भाऊ बनला आहे. लक्ष्मीकांतसह रमेश भाटकर, उदय टिकेकर आणि अशोक शिंदे या चार मित्रांची कथा या चित्रपटात आहे. लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'हमाल दे धमाल' या सुपरडुपर हिट चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सोनाली अधिकारी यांनी भाऊ-बहिण साकारले. सोनालीनं यात अपंग बहिणीची भूमिका साकारली असून, अशोक शिंदे तिच्याशी विवाह करतो. वर्षा उसगावकर, वैशाली दांडेकर, निळू फुले, सुधीर जोशी, विजय पाटकर, रवींद्र बेर्डे, जयवंत वाडकर, शांता इनामदार, चेतन दळवी, अशोक हांडे, आदेश बांदेकर, किशोर नांदलस्कर, नंदू माधव यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

दिग्दर्शक संजय झनकर यांनी २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भाऊ माझा पाठीराखा' या चित्रपटात बहिण-भावाची कथा सादर केली. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद प्रवीण शांताराम यांनी लिहिले असून, अशोक शिंदे, गिरीश ओक, सुरेखा कुडची, योगेश महाजन, शुभदा पाटणकर, जयवंत वाडकर, अनिल गवस, कल्पना साठे, वृशाली गंधे आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. २००७ 'भावाची लक्ष्मी' या संदीप नवरे दिग्दर्शित चित्रपटात एका भावानं बहिणीला दिलेल्या आगळ्यावेगळ्या भेटीची कहाणी आहे. या चित्रपटात मिलींद गवळी, उषा नाईक, डॉ. विलास उजवणे, सुधीर दळवी, सुरेश ओहाळ, स्वप्नील राजशेखर आदी कलाकार आहेत. 'अशी ही भाऊबीज' या चित्रपटात दिग्दर्शक अशोक कार्लेकर यांनी अ‍ॅड. प्रशांत भेलांडे, बाळ धुरी, सुहासीनी देशपांडे, शरद पोंक्षे, शशांक उदापूरकर, मोहीनी पोतदार या कलाकारांच्या साथीनं या नात्याचा एक वेगळा पैलू सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अलिकडच्या काळातील चित्रपटांबाबत बोलायचं तर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं उत्तमरीत्या रेखाटलं आहे. मधुगंधा कुलकर्णीसोबत मोकाशी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली असून, श्रीरंग महाजननं साकारलेला ज्ञानेश आणि सायली भांडारकवठेकरनं साकारेल्या मुक्ताच्या माध्यमातून भाऊ-बहिण सादर केले. 

'हॅपी जर्नी' या चित्रपटात मृत्यूपश्चातही हे नातं कसं अबाधित राहतं त्याची कथा दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं सादर केली. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांनी बहिण-भावाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाप्रमाणंच हे नातं भविष्यातही कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या रूपात मराठी सिनेमाच्या पटलावर अवतरत राहणार यात शंका नाही. कारण या नात्यातील गोडवा कधीही कमी होणारा नसून, उत्तरोत्तर वाढतच जाणारा आहे.संबंधित विषय