Advertisement

ओली की सुकी - रिव्ह्यू


ओली की सुकी - रिव्ह्यू
SHARES

आनंद गोखले दिग्दर्शित 'ओली की सुकी' या सिनेमाचा ट्रेलर जर तुम्ही पहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल हा सिनेमा आहे झोपडपट्टीत राहून आपलं जीवन जगणाऱ्या मुलांचा. यात बुटपॉलिश, भंगार गोळा करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. 6-7 अशा मुलांची टीम..आणि त्यांची दुश्मनी आहे त्यांच्या बाजूच्या इलाक्यात असणाऱ्या 6-7 मुलांशी अशा टिपिकल सीनने सिनेमाची सुरवात होते.

या सगळ्या मुलांना, म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना सुधारवण्याचं काम एक सामाजिक संस्था चालवणारी राधिका देशपांडे म्हणजे तेजश्री प्रधान करत असते.

या मुलांपैकी एकाच्या आईला कॅन्सर असल्याचं त्या मुलाला समजतं आणि त्याला आईला गमावण्याचा विचारही सहन होत नाही. तिच्या उपचारासाठी पैसे कमवायचे असा ठाम निश्चय तो करतो आणि त्याला मदत करण्यासाठी त्याचे सर्व मित्र त्याला पैसे जमवून द्यायचं ठरवतात. आणि कमी वेळात खूप पैसे मिळवण्याच्या विचारात ते चोरी करायचं ठरवतात. पण ज्या गाडीवर ते हल्ला करून त्यातल्या लोकांचे पैसे चोरण्याचा प्लॅन करतात ती नेमकी पोलिसांची गाडी निघते. आणि इथेच त्यांचा पहिला प्लॅन शेवटचा ठरतो.

मग त्यांना शहाणपण येतं आणि वेगवेगळ्या प्रकारे ते मेहनत करून पैसे जमवण्याचा प्रयत्न करायला लागतात. सिनेमात नेमकं काय दाखवायचं हे दिग्दर्शक मांडायला कमी पडलाय. अगदी शेवटचा सीन पाहिला की लक्षात येतं 'अच्छा हे दाखवायचं होत का सिनेमात'! अगदी थोडक्यात सांगायचं झालंच तर, झोपडपट्टीत राहणारी सर्वच मुलं वाईट नसतात, हे या सिनेमात दिग्दर्शकाला सांगायचंय, पण ते काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. सिनेमात उगाच इमोशनल सीन दाखवून प्रेक्षकांना हळवं करण्याचा प्रयत्न ही पार फसलाय. सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सिनेमा प्रेक्षकाला बांधून ठेवण्यात अयशस्वी ठरतो.

सगळ्या मुलांनी त्यांची पात्रं आणि अभिनय चांगले निभावले आहेत. त्यातली काही मुलं खऱ्या आयुष्यात असंच आयुष्य जगतात. त्यामानाने अभिनयाचा काहीही संबंध नसतानाही त्यांनी चांगलं काम केलंय. 

तेजश्री प्रधानचं कॅरेक्टरही फार काही छाप सोडत नाही. भार्गवी चिरमुले, संजय खापरे आणि पोलिसांची भूमिका निभावलेले सुहास सिरसाट आणि वकिलाच्या भूमिकेत दिसणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी त्यांना दिलेले रोल बरे निभावले आहेत.

विषय चांगला, काम करणारी मुलंही चांगली, पण तरीही सिनेमा अगदीच ठीक आहे. सिनेमा पाहाच असं मी नक्कीच म्हणणार नाही. पण हां, तुम्ही जर तेजश्री प्रधानचे चाहते असाल तर मग तुम्ही सिनेमा पाहू शकता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा