Advertisement

‘बळी’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण

बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले.

‘बळी’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण
SHARES

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या आगामी आणि बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून पोस्टरवर त्याचा रक्तरंजित चेहरा दिसतोय.

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय. याची खुणगाठ बांधण्यासाठी हे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’नं केली आहे. या कंपनीनं ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ हे गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.

विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटानं प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.”

या चित्रपटाबद्दल स्वप्नीलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो.”


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा