• Movie Review: लग्नाची बेडी अन् प्रेमाचा फियास्को
  • Movie Review: लग्नाची बेडी अन् प्रेमाचा फियास्को
SHARE

'पती, पत्नी और ती' शैलीतील बरेच सिनेमे आजवर आले आहेत. 'ती अँड ती' या सिनेमाची कथा जरी काहीशी तशीच असली तरी मांडणी आणि सादरीकरण खूपच वेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळं आजवर बऱ्याचदा समोर आलेल्या एका विषयातील काही अप्रकाशित आणि नवीन पैलू या सिनेमात दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी सादर केले आहेत. मृणाल यांचा मुलगा विराजस कुलकर्णीनं अगदी आजच्या तरुणाईला आवडेल अशा शैलीत या सिनेमाचं लेखन आणि संवादलेखन केलं आहे.


नात्यांच महत्त्व

'ती अँड ती' या सिनेमात एका अशा तरुणाची कथा पाहायला मिळते ज्याचं लग्न झालेलं आहे. एक नायक आणि दोन नायिकांच्या अनुषंगानं सिनेमाची कथा मांडताना त्यात वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून नात्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळं सिनेमा सुरू असताना नायक-नायिकेच्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तिरेखा केवळ कथेतील आपलं काम बजावत नसतात, तर मानवी नातेसंबंधातील पैलू सादर करत असल्याचं सिनेमा संपण्यापूर्वी जाणवतं.


सिनेमाची सुरूवात

अनय (पुष्कर जोग), सई (प्रार्थना बेहरे) आणि प्रियांका (सोनाली कुलकर्णी) यांची ही कथा आहे. सिनेमाची सुरुवात हातात बेड्या असलेल्या अनयपासून होते. स्वत:च्याच कामात व्यग्र असलेल्या अनयला आई-वडील आणि मित्र-मैत्रीणीच्या आग्रहाखातर सईशी लग्न करावं लागतं. मेट्रोमॅानी वेबसाईटवर ९६ टक्के गुण मॅच झाल्यानं अनय आणि सई लग्नाला होकार देतात, पण लग्नानंतर त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काहीच भावना नसते.

कुटुंबियांच्या आग्रहावरून मग ते हनीमूनसाठी लंडनला जातात. एअरपोर्टवर उतरल्यानंतर लगेज आणण्यासाठी गेलेल्या अनयला तिथं आपली बालपणीची मैत्रीण प्रियांका भेटते. आपलं पहिलं क्रश असलेल्या प्रियांकाला अनय विसरलेला नसतो. ती आपल्या वडिलांसोबत लंडनमध्ये फिरण्यासाठी आलेली असते. त्यानंतर ती तिथून जवळ असलेल्या विंजींग या गावात स्थायिक होणार असते. एकीकडं सईची नजर चुकवून अनय प्रियांकाला भेटत असतो, तर दुसरीकडं सईची मैत्री समविचारी शेखरशी (सिद्धार्थ चांदेकर)होते. त्यानंतर जी गडबड होते त्यात अनय आणि सईचं काय होतं त्याची गोष्ट या सिनेमात आहे.


सिनेमात रोमँटिक-कॅामेडी

विराजसनं जरी या सिनेमाची कथा तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून लिहिली असली तरी हा सिनेमा मात्र सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा आहे. आजवर कधी ऐतिहासिक, कधी गंभीर, तर कधी मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमा बनवणाऱ्या मृणाल यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या जाॅनरचा सिनेमा बनवला आहे. यापूर्वीही त्यांनी विवाह संस्था आणि पती-पत्नीच्या नात्यावर आधारित सिनेमा बनवला असला तरी या सिनेमात त्यांनी काही वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आपण रोमँटिक-काॅमेडी हा प्रकारही चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याची झलकच मृणाल यांनी दाखवली आहे.


माती खाल्ली

सिनेमाची कथा सुरू झाल्यापासून वेगात पुढे सरकते. लग्न सोहळ्यात वेळ वाया घालवण्याचा मोह टाळण्यात आला आहे. नायक-नायिका थेट हनीमूनसाठी लंडन रवाना होतात आणि कथानकात नवनवीन वळणं येतात. प्रियांका भेटल्यावर अनयच्या थापा मारणं सुरू होतं. ती दृश्यं छान जमली आहेत. 'माती खाल्ली'चा अधूनमधून येणारा स्वरही छान वाटतो. या सिनेमातील नायकानं बालपणापासून तरुण वयात येईपर्यंत आपल्या इच्छांची एक यादी तयार केलेली आहे. सिनेमाचं कथानक त्यानुसार पुढं सरकत टप्प्याटप्प्यानं त्याची विश लिस्ट पूर्ण करतं.


व्यक्तीरेखेची सांगड नात्यांशी

क्लायमॅक्समध्ये एअरपोर्टवर नायकाचं घुसणं, त्याच्या मागं पोलिसांचं धावणं ही थोडी अतिशयोक्ती वाटते. वास्तवात हे शक्य नाही, पण नायकाच्या विश लिस्टमध्ये ते असल्यानं तसं दाखवावं लागलं. असं असलं तरी एकूणच तो प्रकार न पटण्याजोगा वाटतो. लंडनसारख्या ठिकाणी एक तरुण अनधिकृतपणं एअरपोर्टवर घुसतो आणि पोलिस काहीही करू शकत नाही हे पटत नाही. यातील प्रत्येक व्यक्तीरेखेची सांगड नात्यांशी घालण्यात आली आहे. नायक-नायिकेचं नातं, नायक-प्रेयेसीचं नातं, नायकाचे आई-वडील आणि नायिकेचे आई-वडील यांचं नातं, प्रेयेसीच्या वडील आणि मित्राचं नातं, नायकाच्या मित्र-मैत्रीणींचं नातं अशा विविध नात्यांच्या माध्यमातून ही गोष्ट उलगडून दाखवण्यात आल्याचं अतिशय सुरेखपणं सांगण्यात आलं आहे. 


संगीतही चांगल

आजवर कधीही न हाताळलेला जॅानर प्रथमच हाताळण्यात मृणाल यांनी चांगलं काम केलं असलं तरी काही त्रुटीही राहिल्या आहेत. त्याकडं दुर्लक्ष केलं तर कथानक आणि अनपेक्षितपणे घडणारे काही विनोद मनोरंजनाचे क्षण देण्यास सक्षम आहेत. नायक-नायिका लंडनमध्ये गेल्यावर तिथलं निसर्गसौंदर्य मन प्रसन्न करतं, पण यातही काही तांत्रिक त्रुटी राहिल्याचं जाणवतं. मध्यंतरापूर्वीच्या काही दृश्यांमध्ये थोडासा धुरकटपणा जाणवतो. मध्यंतरानंतर मात्र विंजींगमधला निसर्ग डोळ्यांना सुखद अनुभव देतो. गीत-संगीतही चांगलं आहे.


सोनालाची भूमिका अफलातून

सोनाली कुलकर्णीनं प्रियांकाची भूमिका अफलातून साकारली आहे. एका बिनधास्त मुलीची भूमिका तिनं एन्जॅाय करत सादर केली आहे. पुष्कर जोगच्या आजवरच्या करियरमधील हा सर्वोत्कृष्ट परफाॅर्मन्स आहे. एका कन्फ्युज तरुणाची भूमिका त्यानं जीव ओतून साकारली आहे. प्रार्थना बेहरेनंही एका चाणाक्ष आणि कर्तव्यदक्ष पत्नीच्या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे. कथेत ट्विस्ट निर्माण करणारी शेखरची व्यक्तिरेखा सिद्धार्थ चांदेकरनं संयतपणं साकारली आहे. यांना देवेंद्र सरळकर, राधिका काकतकर-इंगळे, मोहन दामले, वंदना वाकनीस, श्रीकर पितरे, परी तेलंग यांची सुरेख साथ लाभली आहे.

रोमँटिक-काॅमेडी असलेला हा हलकाफुलका सिनेमा तरुणाईच्या मनातील प्रश्न मांडणारा आहे. जास्त अपेक्षा न बाळगता हा सिनेमा पाहिला, तर मनोरंजनाचे काही क्षणही नक्कीच गवसतील. त्यामुळं वेळ काढून हा सिनेमा पहायला हवा.


दर्जा : *** 

..............................

निर्माते : विशाल शाह, पुष्कर जोग

दिग्दर्शिका : मृणाल कुलकर्णी

पटकथा-संवाद : विराजस कुलकर्णी

कलाकार : सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे, सिद्धार्थ चांदेकर, देवेंद्र सरळकर, राधिका काकतकर-इंगळे, मोहन दामले, वंदना वाकनीस, श्रीकर पितरे, परी तेलंग, सानिका कुलकर्णी, इशान खोपकर
संबंधित विषय
ताज्या बातम्या