Advertisement

अशोक सराफांच्या उपस्थितीत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचा ट्रेलर लाँच!


अशोक सराफांच्या उपस्थितीत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचा ट्रेलर लाँच!
SHARES

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांनी अलिकडच्या काळात सिनेमांमध्ये काम करणं खूप कमी केलं आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांमध्ये केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्यांचे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आता ‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी मराठी सिनेमात ते दिसणार आहेत. अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थित ‘हृदयात समथिंग समथिंग’चा ट्रेलर लाँच करण्यात आला.


'या' कलाकारांची उपस्थिती

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. या सर्व कलाकारांसोबत सिनेमाची म्युझिक टिमही ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होती.


काय म्हणाले अशोक सराफ?

ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना अशोक सराफ म्हणाले की, चांगली कथा, उत्तम दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार यामुळे कोणत्याही धाटणीचा सिनेमा मनोरंजक होत जातो. ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा सिनेमा प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपल्या हृदयाजवळचा वाटेल, असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला.


सिनेमा खूप मनोरंजक

दिग्दर्शक प्रविण राजा कारळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, अशोकमामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न ‘हृदयात समथिंग समथिंग’ या सिनेमामुळे पूर्ण झालं. प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतींना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमुळे रंगवायला खूप मदत झाली. त्यामुळे सिनेमा खूप मनोरंजक झाल्याची भावनाही कारळे यांनी व्यक्त केली.


साठाव्या कलाकृतीचा कौतुक सोहळा

सिनेमाचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर म्हणाले, आजपर्यंत मी ३१ मालिका आणि २९ चित्रपट लिहिले. ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा माझा २९वा चित्रपट म्हणजेच ६०वी कलाकृती. वयाची साठी गाठणं जसं कौतुकाने साजरी करतात. तसाच हा आपल्या साठाव्या कलाकृतीचा कौतुक सोहळा असल्याचं कालेलकर म्हणाले.

सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, माझी ही पहिली निर्मिती आहे. सिनेमा बनवण्याचे स्वप्न मी कित्येक वर्षांपासून पाहत होतो. मी आणि शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, अतुल गुगळे या तीन मित्रांसोबत या सिनेमाची निर्मिती केली. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा