Advertisement

मराठीतील मोगली पाहिला का?

आपण सगळ्यांनी हिंदीतला मोगली पाहिला असेल, पण आता मराठीतही मोगली पहायला मिळणार आहे. हिंदीतला मोगली सर्वांनाच आवडला होता. त्यामुळंच मराठीतील मोगलीबाबतची उत्सुकता वाढली आहे.

मराठीतील मोगली पाहिला का?
SHARES

काही मालिकांमधील कॅरेक्टर्स जितकी बच्चे कंपनींमध्ये पॅाप्युलर होतात तितकीच ती थोरामोठ्यांनाही आपलीशी वाटतात. असंच एक कॅरेक्टर आहे मोगली. हा मोगली आता मराठी चित्रपटातही दिसणार आहे.


मोगलीची व्यक्तिरेखा 

आपण सगळ्यांनी हिंदीतला मोगली पाहिला असेल, पण आता मराठीतही मोगली पहायला मिळणार आहे. हिंदीतला मोगली सर्वांनाच आवडला होता. लहान मुलांसोबतच त्यांच्या पालकांनीही त्याचं कौतुक केलं. मुलांसोबत तो मोठ्यांमध्येही चांगलाच पॅाप्युलर झाला. त्यामुळंच मराठीतील मोगलीबाबतची उत्सुकता वाढली आहे. आगामी 'खिचिक' या मराठी चित्रपटातून हा मोगली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खिचिक या चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं आहे. याच चित्रपटात शौर्य उर्फ यश खोंड या बालकलाकारानं मोगलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.


टर्निग पॅाइंट

मूळचा परभणीचा असलेला यश वडिलांच्या बिझनेसमुळं पुण्यात लहानाचा मोठा झाला आहे.  लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. गणपतीमध्ये नक्कल करणं असो, वा चित्रपटातले संवाद हुबेहुब म्हणून दाखवणं असो. यशनं सगळ्यांची मन जिंकली आहेत. अभिनयासोबत नृत्याचीही आवड असलेल्या यशने डान्सवरही खूप मेहनत घेतली आहे. यशच्या अंगी असलेले सुप्त गुण लक्षात आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला अभिनय क्षेत्रातच पुढे नेण्याचा निर्णय घेतला.  एकदा त्यांची भेट दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांच्याशी झाली. हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात टर्निग पॅाइंट ठरला. 


फटफटी

पाटील यांची भेट झाल्यानंतर यशनं पुण्यातील अॅक्टप्लॅनेट अॅक्टिंग अॅकॅडमीमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या अभिनयामधील उणिवा दूर केल्या. त्यानंतर प्रितम यांनी आपल्या आगामी 'खिचिक्' चित्रपटासाठी यशची निवड केली. या चित्रपटात यशनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव फटफटी आहे. हे पारधी समाजातील एका लहान मुलाचं कॅरेक्टर आहे. जो अतिशय खोडकर आहे आणि दिसायला थेट मोगलीसारखा आहे. त्याचं जीवनही बरंचसं मोगलीसारखंच आहे. जंगलात राहणं, मासोळ्या पकडणं आणि दिवसभर धुडगूस घालणं असे उद्योग हा फटफटी करतो. 


१० किलो वजन घटवलं

एक दिवस त्याच्या आयुष्यात एक खिचिक घटना घडते. मग नेमकं काय होतं. त्यातून या व्यक्तिरेखेचा प्रवास दिग्दर्शक पाटील यांनी उलगडला आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेणं गरजेचं होतं. पण, प्रयत्नांची कोणतीही कसर यशनं सोडली नाही. गुबगुबीत देहाच्या यशनं या भूमिकेसाठी चक्क दहा किलो वजनही कमी केलं. पारधी समाजाची भाषा, त्यांचं जीवन, देहबोली हे सगळं काही तो अवघ्या चार महिन्यात शिकला. शहरात वाढलेला यश ते जंगलात राहणारा फटफटी असा प्रवास त्यानं उत्तमरित्या साकारल्याचं सांगत दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 


२० सप्टेंबरला प्रदर्शित 

पाटील यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून, रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण आदी कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. खिचिक हे नाव अनोखं शीर्षक असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा  -

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्ला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा