'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचं निधन

 Mumbai
'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचं निधन

मुंबई - प्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर (85) यांचं त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 


आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1932 मध्ये झाला. जयपूर घराण्यातील गायिका किशोरी आमोणकर यांनी आई मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून मार्गदर्शन घेत हिंदुस्तानी शास्त्रीय पंरपरेतील अग्रणी गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किशोरी आमोणकर या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. 

किशोरी आमोणकर यांनी 1950 च्या दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने'साठी त्यांनी पार्श्वगायन केले. तर 'दृष्टी' या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत.

कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल 1985 साली पद्मभूषणने तर 2002 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं.   
Loading Comments