Advertisement

मराठी कार्यक्रमात अवतरल्या विदेशी अप्सरा!

झी युवा वाहिनीने 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. लावणीप्रेमींसाठी एक प्रकारे लावणी महोत्सवच असलेल्या या कार्यक्रमात २२ वर्षीय क्लॉडिया आणि लीटा या कोलंबियाच्या रहिवासी असलेल्या नर्तिकाही सहभागी झाल्या आहेत.

मराठी कार्यक्रमात अवतरल्या विदेशी अप्सरा!
SHARES

महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकपरंपरा आज सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. त्यामुळेच परदेशात होणाऱ्या मोठमोठ्या कॅान्सर्टमध्येही महाराष्ट्राच्या लोककलेला भरभरून दाद मिळत असते. तिथल्या काही लावण्यवतीही महाराष्ट्राची लोककला आत्मसात करण्यासाठी मेहनत घेत असल्याचं छोट्या पडद्यावर नुकत्याच सुरू झालेल्या 'अप्सरा आली' या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या क्लॅाडीया आणि लीटा या अप्सरा बनण्यासाठी आलेल्या नर्तिका लावणीच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.


लावणीची परंपरा 

महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे. त्यात लावणी या नृत्यप्रकाराचा महत्त्वाचा वाटा असून रसिकांचं मनोरंजन करण्यातही लावणी यशस्वी ठरलेली आहे. लावणीची हीच परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पुर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम.

 

कोलंबियाच्या नर्तिका

लावणीप्रेमींसाठी एक प्रकारे लावणी महोत्सवच असलेल्या या कार्यक्रमात २२ वर्षीय क्लॉडिया आणि लीटा या कोलंबियाच्या रहिवासी असलेल्या नर्तिकाही सहभागी झाल्या आहेत. लावणी हा नृत्यप्रकार शिकण्यासाठी दोघीही अनेक अडचणींचा सामना करून भारतात आल्या. त्यांनी या नृत्याचं प्रशिक्षण घेतलं.  पुरेसे पैसे नसतानाही त्यांनी खडतर प्रवास करत भारत गाठला. 


कोलंबियात लावणी

दोघींनी लावणीनृत्य फक्त आत्मसातच केलं नाही, तर कोलंबियामध्ये जाऊन हे नृत्य इतरांना शिकवण्यासाठी 'अंजली' नावाचं इन्स्टिट्यूटदेखील चालू केलं. भाषा आणि दोन देशांमधील अंतर याचा अडथळा पार करत क्लॉडिया आणि लीटा 'अप्सरा आली' या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. लावणीप्रती त्यांच्या मनात असलेल्या प्रेम आणि जिद्दीला तोड नाही. 


१ महाअप्सरा निवडणार

क्लॅाडीया आणि लीटा यांच्यासारख्या काही लावण्यवतींमुळे लावणीची महती सातासमुद्रा पलीकडे पोहोचली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १४ अप्सरांपैकी १ महाअप्सरा निवडण्याची जबाबदारी मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी, सुरेखा पुणेकर आणि दीपाली सय्यद या तिघींवर सोपावण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सांभाळत आहे.



हेही वाचा - 

'अप्सरा आली' म्हणत सोनाली बनली परीक्षक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा