Advertisement

'अप्सरा आली' म्हणत सोनाली बनली परीक्षक


'अप्सरा आली' म्हणत सोनाली बनली परीक्षक
SHARES

दिग्दर्शक रवी जाधवच्या 'नटरंग'मधील संगीतकार अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं 'अप्सरा आली...' हे गाणं सुपरहिट झाल्यापासून 'अप्सरा' म्हटलं की त्या गाण्यात परफॅार्म करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीच सर्वप्रथम आठवण येते. या गाण्यातील अदाकारीने सोनालीने केवळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच नव्हे, तर अमराठी रसिकांनाही वेड लावलं आहे. आता हीच सोनाली 'अप्सरा आली' असं म्हणत परीक्षक बनली आहे.


बहारदार लावणी नृत्य

झी युवा ही वाहिनी तरुणाईसोबत इतर वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करीत मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांची मनोरंजनाची आवड लक्षात घेऊन, झी युवाने प्राईम टाईमदेखील वाढवला आहे. या वाहिनीने प्रेक्षकांसाठी दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमदेखील सादर केले आहेत. ही वाहिनी लवकरच 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे.


परीक्षकाची भूमिका

'अप्सरा आली...' हे ठसकेबाज गाणं आणि या गाण्यातून जिने अख्ख्या महाराष्ट्राला घायाळ केलं ती  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिच्या मनमोहक अदा आणि सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेली सोनाली आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली खुद्द 'अप्सरा आली' या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. 


५ डिसेंबरपासून प्रसारण 

या कार्यक्रमात स्पर्धक महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अखंड महाराष्ट्रतील टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तसंच या कार्यक्रमात प्रेक्षक अनेक अदाकारी आणि त्यांच्या लावणीचा ठसका पाहू शकतील. ५ डिसेंबरपासून या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू होणार आहे. याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे. 'अप्सरा आली' सारख्या डान्स रिऍलिटी शोचं परीक्षण करण्याची माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील लोकनृत्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे तसंच 'अप्सरा आली' मुळे लावणी नृत्याची परंपरादेखील प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे मी या कार्यक्रमाबाबत खूप उत्सुक आहे.



हेही वाचा - 

पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पाटील’

हे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा