Advertisement

खजाना गझल महोत्सवात दिग्गजांची जुगलबंदी

‘खजाना’ या गझल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं यंदाचं १७ वं पर्व मुंबईमध्ये २७ व २८ जुलै २०१८ रोजी नरीमन पॉइंट येथील द ओबेरॉय हॉटेलमधील रिगल रूममध्ये रंगणार आहे.

खजाना गझल महोत्सवात दिग्गजांची जुगलबंदी
SHARES

द कॅन्सर एड असोसीएशन (सीपीएए), द पॅरेंटस् असोशिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या तीन संस्थांनी मिळून कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण आणि मुलांकरता निधी संकलन करण्यासाठी ‘खजाना’ या गझल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं यंदाचं १७ वं पर्व मुंबईमध्ये २७ व २८ जुलै २०१८ रोजी नरीमन पॉइंट येथील द ओबेरॉय हॉटेलमधील रिगल रूममध्ये रंगणार आहे.


या मान्यवरांची उपस्थिती

या महोत्सवाची घोषणा करण्यासाठी गझल गायक पंकज उधास, अनुप जलोटा, तलत अझीझ, गायक सुदीप बॅनर्जी, बासरीवादक राकेश चौरसिया, सितारवादक पुर्बयान चॅटर्जी आणि तबलावादक ओजस अधिया, पृथ्वी गंधर्व, दिवाकर मीना, राजविंदर कौर, गायत्री गायकवाड, आदित्य लांगेह, ओशिन भाटीया आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)चे अध्यक्ष वाय के सप्रू आदी मान्यवर मुंबईत एकत्र आले होते.


गायकांची जुलगबंदी

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलप्रेमींना भारतातील आघाडीच्या आणि नावाजलेल्या गझल गायकांची जुलगबंदीचं अनुभव दररोज संध्याकाळी ७.३० वाजता अनुभवता येणार आहे. हे सर्व कलाकार या महोत्सवामध्ये आपली अदाकारी सादर करणार आहेत. ‘खजाना-अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ ही संकल्पना १७ वर्षे जुनी आहे. सांगीतिक गुणवत्तेची पारख असलेल्या प्रेक्षकांसमोर गझल गायकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे.

या महोत्सवाबाबत पंकज उधास म्हणाले, १७व्या ‘खजाना गझल फेस्टिव्हल’मध्ये ‘मुहब्बत’ ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. यातून प्रेमाच्या वैविध्यपूर्ण भावना व्यक्त होणार आहेत. यंदाही हा महोत्सव गतवर्षींप्रमाणेच यशस्वी ठरेल, असा विश्वासही उधास यांनी व्यक्त केला.


गझल गायकांची शोध स्पर्धा

थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘खजाना’मध्ये गजलांचा अनोखा असा उत्सवच साजरा होतो. हा उपक्रम एवढी वर्षे अविरतपणे सुरू आहे. यावेळी ‘खजाना आर्टीस्ट अलाऊड टॅलेंट हंट’ या भारतातील पहिल्या वहिल्या गझल गायकांची शोध स्पर्धा घेण्यात आली. भारतातील ७५ शहरांमधून भव्य प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबई ते प्रतापगड, दिल्ली ते विदिशा आणि बेंगळूरू ते सीतामढी या देशाच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धकांचं परीक्षण पंकज उदास, रेखा भारद्वाज, तलत अझीझ, अनुप जलोटा आणि सुदीप बॅनर्जी यांनी केलं. स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. यातील दोन विजेत्या कलाकारांना बहुप्रतीक्षित अशा ‘खजाना गझल महोत्सवा’मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे.


हे कलाकार गाणार

यंदाच्या ‘खजाना’मध्ये पंकज उदास, अनुप जलोटा, तलत अझीझ, रेखा भारद्वाज, रिचा शर्मा, सुदीप बॅनर्जी यांच्यासह मामे खान यांची विशेष अदाकारी सादर होणार आहे. त्याशिवाय कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरासिया, पुर्यबान चॅटर्जी, दीपक पंडित आणि ओजस अधिया यांनी संयोजन केलेली अनोख्या गझलही सादर होणार आहेत. गायत्री गायकवाड, पृथ्वी गंधर्व, दिवाकर मीना, राजिंदर कौर, आभास आणि श्रेयस जोशी आणि बालकलाकार स्नेहा शंकर हे नवोदित कलाकारही या महोत्सवात गाणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा