१२ आमदार भाजपा सोडणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून निवडून आलेले आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत.

SHARE

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होऊन अवघा एक आठवडा झाला आहे. मात्र, आता राजकीय हालचालींना वेग आला असून १२ आमदार भाजपाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. या आमदारांसह राज्यसभेतील भाजपाचे एक खासदारही भाजपाला सोडचिट्टी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून निवडून आलेले आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश आहे. तर इतर ४ आमदार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारीही या आमदारांची आहे.  राज्यातील सत्तांतरानंतर राज्यसभेतील भाजपा खासदाराने पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची तयारी दाखविली आहे.

ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे हे आमदार निवडून आले त्यांना त्या-त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर या आमदारांच्या प्रवेशावर विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झालेले सात आमदार संबंधित पक्षांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेले भाजपचे चार असंतुष्ट आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते.


संबंधित विषय
ताज्या बातम्या