Advertisement

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा मुंबईत मोर्चा काढणार आहे.

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा
SHARES

आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली. ईडीच्या कारवाईनंतर भाजपानं मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप अटक न झाल्यानं भाजपानं आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. त्यानुसार, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा मुंबईत मोर्चा काढणार आहे.

भाजपा बुधवारी मुंबईत महा मोर्चा काढणार आहे. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यामुळं भाजपाच्या आंदोलनानंतर महाविकास आघाडी सरकार मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

यावर “भेट झाली असून अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीस न्यायीक पद्धतीने वागतील, राजकीय नाही अशी आमची अपेक्षा आहे. परवानगी न दिल्यास परवानगीशिवाय मोर्चा काढणार. राजीनामा घेतला जात नाही तोवर हे आंदोलन सुरु राहील. जनतेची प्रतिक्रिया सरकारमध्ये बसलेल्या लोकांना विसर्जित करुन टाकेल,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सरकार दाऊदचे समर्थक आहे काय? अशी विचारणा करत घोषणा देण्यात आल्या.

“हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे. नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडी दिली असून जामीन मंजूर केलेला नाही याचा अर्थ न्यायालयसुद्धा सक्षमपणे काम करत आहे. तरीही केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा सरकारमध्ये बसलेल घेत नाहीत. दुख: तर उद्धव ठाकरे यात सहभागी आहेत याचं आहे”, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखतीत म्हटलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा