Advertisement

महाराष्ट्रात लष्कराला बोलवा म्हणणाऱ्यांनो ‘हे’ आकडे बघा- उद्धव ठाकरे

मुंबईमध्ये वाताहत झाली, लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्यांना म्हणा, हे आकडे बघा! हे आकडे बोलके आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टाेला हाणला.

महाराष्ट्रात लष्कराला बोलवा म्हणणाऱ्यांनो ‘हे’ आकडे बघा- उद्धव ठाकरे
SHARES
Advertisement

आतापर्यंत महाराष्ट्रात ६५ हजार रुग्णांमधून २८ हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता आपल्याकडे ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यापैकी साधारणतः २४ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली, मुंबईमध्ये वाताहत झाली, लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्यांना म्हणा, हे आकडे बघा! हे आकडे बोलके आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टाेला हाणला. रविवार ३१ मे रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

गर्दी करू नका 

पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदानांवर, समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगिंग आणि धावणे-चालणे या गोष्टींला मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पहाटे ५ पासून सायंकाळी ७ पर्यंत असे व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही. गर्दी करण्यास, सभा-समारंभ आणि उत्सव करण्यास अजूनही परवानगी नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, आपल्याला कुठेही गर्दी करून सुरु झालेल्या गोष्टी बंद करायच्या नाहीत.   

आकडेवारी बोलकी

आजघडीला राज्यात ६५ हजार कोविड रुग्ण असून त्यातील २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचं व प्रत्यक्षात ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं सांगितलं. या ३४ हजार रुग्णांमध्ये २४ हजार रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाचे कोणतीही लक्षणं नाहीत, औषोधोपचाराची गरज नाही. पण ते क्वारंटाईन आहेत. मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ९५०० आहे. १२०० रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असं म्हणणाऱ्यांसाठी ही आकडेवारी बोलकी आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

सर्वोच्च बिंदूजवळ  

सध्या आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या सर्वोच्च बिंदूजवळ किंवा त्यावर आलो आहोत. केसेसची संख्या कमी जास्त होत जाईल परंतू त्यापुढे हळुहळु ही संख्या कमी होत जाईल. रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असल्याचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी यात करण्यात आलेल्या भरीव वाढीची माहिती दिली. राज्यात सुरुवातील ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा होती आता २५७६ रुग्णालयात ती उपलब्ध आहे. अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध आहेत.  आयसीयू बेडसची संख्या २५० हून ८५०० इतकी वाढवली आहे. मृत्यूदर कमी करायचा नव्हे तर तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करताना  यासाठी सर्दी, पडसे, खोकला, वास न येणे, चव न लागणे, यासारखे लक्षणे असल्यास त्वरित रुग्णालयात येऊन वेळेत उपचार करून  घ्यावेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.


संबंधित विषय
Advertisement