Advertisement

परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे

परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी आपण सातत्याने केंद्र सरकारकडे करत होतो. परंतु परिस्थिती बिकट झाल्यानंतर केंद्राने ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून परप्रांतीय मजूर स्वगृही परतत आहेत. महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) ट्रेन आणि बसच्या माध्यमातून आतापर्यंत ६ ते ७ लाख मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडलं आहे. येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी केलं.

ट्रेन उशीरा सोडल्या 

उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी रविवार २४ मे २०२० रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून परराज्यात जात असलेल्या परप्रांतीय मजुरांबाबतची (migrant workers) माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना संकटाच्या (covid-19) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व परप्रांतीय मजुरांना आहात तिथेच राहा असं आवाहन केलं, त्यांच्या खाण्यापिण्याची, निवासाची, आरोग्याची सर्व सुविधा केली. परंतु सरकारचा न ऐकता हे परप्रांतीय आपापल्या कुटुंबकबिल्याला घेऊन मिळेल त्या मार्गाने घरी जाण्यासाठी निघाले. या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी आपण सातत्याने केंद्र सरकारकडे करत होतो. परंतु परिस्थिती बिकट झाल्यानंतर केंद्राने ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा - पॅकेजच्या पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही- उद्धव ठाकरे

पैसे मिळतील

केंद्राने रेल्वेची सोय केल्यानंतर परप्रांतीयांच्या तिकीटासाठी ८५% रक्कम जाहीर केली. ही तिकीटाची रक्कम अजून राज्य सरकारला मिळायची आहे. जसे केंद्राचे इतर पैसे मिळाले, तसे हेही मिळतील. पण राज्य सरकारने या मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी आतापर्यंत ४८१ ट्रेन्स सोडल्या आहेत. तर तब्बल ८५ कोटी रुपये ट्रेनच्या भाड्यापोटी दिले आहेत. यातून आजपर्यंत ६-७ लाख प्रवासी मजुरांना आपण त्यांच्या राज्यात पोहोचवलं आहे. या मजुरांच्या संख्येकडे पाहता दिवसाला किमान ८० ट्रेन सोडण्याची परवानगी आपण मागितली आहे, परंतु अद्याप दिवसाला ४० ट्रेनच सोडल्या जात आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 

तर, दिशाहिन भटकंती करणाऱ्या मजुरांना घेऊन एसटी महामंडळाची बस त्यांना ज्या स्टेशनवर जायचं आहे, त्या स्टेशनवर सोडत आहे, काही लोकांना एसटीमधून परराज्यात नेत आहे. एसटी बसेसच्या ३२,००० फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून आपण ३,८०,००० मजुरांना स्टेशनपर्यंत किंवा त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवलं आहे.

कामावर परतले

महाराष्ट्रात जवळपास ५०,००० उद्योग सुरू झाले आहेत. त्यामध्ये अनेक मजूर कामावर आले आहेत. रोजगार हमी योजनेमध्येसुद्धा काही लाखांमध्ये मजुरांनी काम करायला सुरुवात केली आहे. भिवंडी आणि मालेगाव येथील यंत्रमाग सुरू करायला आपण परवानगी दिली आहे.

या स्थलांतराकडे पाहता, परवा सोनिया जी आणि इतर सर्व पक्षांतल्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये मी बोललो होतो की, पुढच्या १५ दिवसांत आपल्या देशाचं खरं चित्र समोर येईल, आपण नेमके कुठे आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.   

हेही वाचा - मुंबईचे ठाकरे फाकरे माझं काय करू शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून काय करणार?

संबंधित विषय
Advertisement