Advertisement

‘जय महाराष्ट्र’ मुळे दिवाकर रावते पेचात


‘जय महाराष्ट्र’ मुळे दिवाकर रावते पेचात
SHARES

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे माध्यम प्रतिनिधींना थट्टा आणि वास्तव यांच्यातला फरक ओळखण्याचं प्रशिक्षण देऊ पाहत आहेत. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेलं उत्तर सर्वदूर झाल्यानंतर रावते यांना माध्यमकर्मींसाठी अशा प्रशिक्षणाची गरज भासू लागली आहे.

'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलं जाणार'- महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचं वक्तव्य. काही माध्यमप्रतिनिधींनी दिलेल्या या ‘एक्स्लुसिव्ह’ बातमीने धमाल उडवून दिली. आपण ‘ते’ विधान केलं. पण त्यातून ‘निघालेली बातमी’ चुकीची असल्याचं दिवाकर रावते यांचं मत आहे. आपल्या बोलण्यातल्या थट्टेचा सूर ओळखता न आल्यामुळे हा घोळ झाल्याचं स्पष्टीकरण रावते यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना दिलं.

दिवाकर रावते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बैठकीसाठी ते पुण्याला गेले असताना घडला. नव्या बसेसची बांधणी, पंढरपूरसाठी एसटीच्या संभाव्य विशेष सुविधा आदी अतिशय महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर तिथे माध्यमप्रतिनिधींनी रावते यांना विविध प्रश्न विचारले. तेव्हा एका वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाला “आता ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या एसटी बसेस कर्नाटकच्या दिशेने पाठवणार.’’ या आशयाचं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेलं उत्तर चर्चेला काळ ठरलं. कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी तिथल्या मराठी लोकप्रतिनिधींना ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास मज्जाव केला. ‘जय महाराष्ट्र’ चा नारा देणाऱ्या लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाईल. तसंच याबाबतीतलं विधेयक लवकरच आणलं जाईल, अशी अजबगजब घोषणा बेग यांनी केली होती. त्यांच्या मुक्ताफळांचे स्वाभाविक पडसाद महाराष्ट्रात उमटले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्राची बाजू त्वेषाने मांडणारे दिवाकर रावते यांनीसुद्धा बेग यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या घटनेची पार्श्वभूमी, कट्टर शिवसैनिक असलेल्या दिवाकर रावते यांचा रोखठोक स्वभाव आदींची सरमिसळ लक्षात घेता सदर बातमीत तथ्य नसेल, अशा शंकेनं क्वचितच कुणाच्यातरी मेंदूत घर केलं असतं. मात्र, रावते यांनी घडला प्रकार ‘मुंबई लाइव्ह’ला उकलून सांगितला आहे.

कुठलं टोक गाठून काय निष्कर्ष काढायचा, हे बातमी पसरवणाऱ्यांना समजवायला हवं. मी पुण्यात एसटी महामंडळाच्या बैठकीसाठी गेलो होतो. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी माझ्यावर विविध प्रश्नांचा भडिमार केला. विषयाला धरून नसलेले प्रश्न विचारले गेले. त्यातलाच एक प्रश्न महाराष्ट्र-कर्नाटक वादासंदर्भात होता. या विषयावर माझी प्रतिक्रिया मी वेळोवेळी दिलेली आहे. बैठकीच्या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाणं अप्रस्तुत होतं. प्रश्नकर्त्याचा प्रश्न टाळण्यासाठी मी ‘ते’ विधान केलं. माझा हेतू पत्रकारांच्या लक्षात येईल, अशी माझी अपेक्षा होती. दुर्दैवाने ती चुकीची ठरली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला आहे.
दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा