Advertisement

टीका करणं एवढेच मनसेचं काम- अनिल परब


टीका करणं एवढेच मनसेचं काम- अनिल परब
SHARES

ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्य सरकारनं रात्रीची संचार बंदी लावली आहे. या संचारबंदी वरून अनेकांनामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तर अनेक नेत्यांकडून या संचारबंदीवर टीका केली जात असून, मनसेनं या 'रात्रीचाच कोरोना असतो का', असा सवाल केला होता. त्यामुळं सत्ताधारी महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात वाद निर्माण झाला. मात्र, मनसेच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना, कोरोनाचा फैलाव होणारच नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही लिहून द्या, मग रात्री किंवा दिवसा काय करायचे, याचा विचार करता येईल, अशा शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरूवारी मनसेला फटकारले.

रात्रीच्या संचारबंदीवरून मनसेनेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका करताना 'रात्रीचाच कोरोना असतो का' असा सवाल केला होता. संदीप देशपांडे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना 'अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम त्यांच्याकडे राहिलेले नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावले लोकांच्या काळजीसाठी आणि हितासाठी आहेत', असं परब यांनी म्हटलं.

वर्षअखेरीस नाताळ किंवा नव्या वर्षानिमित्ताने रात्रीच्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अशावेळी कोरोनाचा संक्रमण वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केल्याचं ही त्यांनी म्हटलं. ब्रिटनहून येणारा कोरोना विषाणू फैलावाची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री याबाबत काळजी घेत आहेत. त्याचबरोबर जे कामकाज सुरू झाले आहे ते थांबणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागत आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा