फेरीवाल्यांनो, १६ वा दिवस धोक्याचा!


SHARE

मुंबईतील सगळ्या रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाल्यांना पुढच्या १५ दिवसांत हटवा, नाहीतर १६ व्या दिवशी मनसे मैदानात उतरून या सगळ्या फेरीवाल्यांना आपल्या पद्धतीनं हटवेल, असं रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारला खुलं आव्हान देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित 'मोर्चा'त आपला संताप व्यक्त केला.


नाहीतर तर मनसे स्टाईल...

राज यांच्या इशाऱ्यानुसार येत्या १५ दिवसांत जर रेल्वे प्रशासनाला मुंबई शहर, उपनगरांतील रेल्वे स्थानकं, ब्रिज फेरीवालामुक्त करता आले नाही, तर मनसे कार्यकर्ते आणि रेल्वे प्रशासनात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


चालणंही मुश्कील

एका बाजूला रेल्वे स्थानकातली गर्दी वाढताना प्रवाशांना मूलभूत सोई मिळणंही मुश्कील झालंय. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलाय. प्रवेशद्वार, रेल्वे ब्रिज सगळ्या जागा फेरीवाल्यांनी व्यापल्यात. त्यामुळं प्रवाशांना नीट चालताही येत नाही, अशी स्थिती आहे.


कुणासाठी बुलेट ट्रेन?

तर, दुसऱ्या बाजूला मोदी सरकारनं अहमदाबाद ते मुंबई अशा बुलेट ट्रेनचा घाट घातलाय. मुंबईतल्या कुणाला हवीय बुलेट ट्रेन??? १ लाख कोटी रुपये कुठल्या मुठभर लोकांसाठी खर्च केले जाताहेत..? मुंबईकरांना त्यातून काय मिळणार?? मोदी, अमित शहा सारखे एक दोन माणसे देश चालविणार का?? असा खणखणीत सवाल राज यांनी भाषणादरम्यान उपस्थित केला.


पुढची रणनिती काय?

बुटेल ट्रेनमध्ये जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा मुंबईतच ढोकळा स्वस्त मिळतो. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढलं. बुलेट ट्रेनला पहिल्यांदा मी विरोध केला. नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं म्हणत राज यांनी मुंबईतल्या लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नावर टार्गेट केलं.

मुंबईतल्या फेरीवाल्यांमध्ये प्रामुख्याने परप्रांतीयांचा समावेश आहे. त्यामुळे हे फेरीवाले हटविण्यासाठी आता १६ व्या दिवशी मनसेची रणनिती काय असेल? याकडेच सर्वच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मनसेने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर राग व्यक्त करण्यासाठी तसेच जाब विचारण्यासाठी मेट्रो सिनेमा ते चर्चचेट स्थानक असा ‘संताप मोर्चा’ काढला. दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मोर्चा चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर मनसेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिलं.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय