नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पत्रकार परिषदेत फडणवीसांनी निलोफर यांचे पती समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावा केला आहे. मात्र फडणवीसांनी केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे असल्याचं निलोफरनं सांगितलं आहे. त्यावरून आता निलोफरचे पती समीर खान यांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे आणि तशी नोटीस देखील त्यांनी फडणवीसांना पाठवली आहे.
राज्यात ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. मलिकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर बनावट नोटांचे आरोप लावले.
तर फडणवीसांनी देखील मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याची टीका केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी "डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडते" असे ट्विट केले होते. त्यावर निलोफर मलिक यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, "आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा" असे उत्तर दिले होते. अमृता फडणवीस यांच्या बिगडे नवाब टि्वटचाही निलोफर मलिक यांनी समाचार घेतला होता.
अमृता फडणवीस यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'बिगडे नवाब' असे म्हणत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांची खिल्ली उडवली. तसंच प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढंच सध्या मलिकांचं लक्ष आहे, असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीसांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक हिने प्रत्युत्तर दिलं. कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतीलच. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे, असं निलोफर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
