'शिवसेनेकडून फक्त विकासकामांचं गाजर'

  Vidhan Bhavan
  'शिवसेनेकडून फक्त विकासकामांचं गाजर'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - महापालिका निवडणुकीत शिवसेना कमी पडत आहे. निवडणुकांच्या तोंडावर जनतेसमोर विविध घोषणाबाजी करून विकासकामांचा गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

  एकीकडे युती करण्यासाठी शिवसेना-भाजप चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते शिवसेनेच्या कारभाराला माफियाराज म्हणत आहे. जनतेला हे नेहमी फसवू शकत नाहीत. युती सरकार प्रत्येक गोष्टींमध्ये फेल ठरले आहे. गेल्या अडीच वर्षात या सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. जनतेलाही आता कळले आहे की हे सरकार आपल्या काही कामाचं नाही, असा टोला तटकरेंनी यावेळी लगावला.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली. तेथील राजकीय परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना तटकरे म्हणाले, "समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीची भूमिका आहे. काही जिल्ह्यात आघाडी करण्याबाबतची यशस्वी चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्याबाबत भूमिका जाहीर करु. काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःहून आघाडीबाबत विचारणा करणार आहे". 

  मुंबई पालिका निवडणुकांसाठीच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीबाबतही जयंत पाटील, नवाब मलिक, सचिन अहिर यांच्यात चर्चा झाली असून मुंबईत काही ठिकाणी उमेदवारांमध्ये चुरस आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईतील दुसऱ्या यादीबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.