शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच दगडाच्या खाणी बंद

  Mumbai
  शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच दगडाच्या खाणी बंद
  मुंबई  -  

  मुंबईतील अनेक रस्त्यांची कामेही खडी अभावी रखडल्याने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे म्हणून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रयत्न करत असतानाच या दगडाच्या खाणी केवळ शिवसेनेलाच बदनाम करण्यासाठीच बंद करण्यात आल्याचा आरोप करत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी भाजपावर नेम साधला. दगडाच्या खाणी बंद करण्याची हीच वेळ आहे का? असा सवाल करत सभागृह नेत्यांनी यामागे मोठे राजकारण असल्याचाही आरोप करत भाजपाकडे बोट दाखवले आहे.

  मुंबईतील सिमेंट रस्त्यांचे सांधे भरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता, काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी एस.व्ही. रोडवरील साईड पट्टयांचे काम कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्यामुळे रखडले असल्याची बाब समोर आणली.यावर शिवसेनेचे आशिष चेंबुरकर यांनी वरळीतील सहा रस्त्यांची कामे खडी मिळत नसल्यामुळे बंद आहेत, असे सांगितले. पावसाळ्यात हे रस्ते न बनल्यास किंबहुना त्यांची दुरवस्था झाल्यास स्थायी समिती जबाबदार नसेल,असेही त्यांनी प्रशासनाला सुनावले. यावर रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी रस्त्यांची कामे खडी अभावी बंद पडलेली असून, ठाण्यातील दगड खाणी बंद करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्याचे स्पष्ट केले.  

  त्यानुसार आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, 31 मे पर्यंत खडी उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी कंत्राटदारांकडून कार्यपद्धतीचे उल्लंघन होणार नाही याचे हमीपत्र देण्याचीही सूचना केली आहे, असेही संजय दराडे यांनी सांगितले.

  याला भाजपाच्या मनोज कोटक यांनी हरकत घेऊन मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन आपण दिशाभूल करू नका, असे प्रशासनाला सांगितले. निविदेतील अटीप्रमाणे खडी ही कंत्राटदाराने आणायची आहे. ती ठाण्यातील दगड खाणीतूनच आणायची अशी कोणतीही अट नसून, मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे करून प्रशासन हे सांगत असले तरी या खाणी सुरुच करता येणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावावर काही खपवू नका, असे सांगितले. 

  यावर सभागृहनेते यशवंत जाधव म्हणाले कि, पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे हरित लवादाने या खाणी बंद करण्याचे आदेश दिले. परंतु या खाणी आत्ताच का बंद झाल्या? कुणाला विमानातून जाताना त्या खाणी दिसल्या म्हणून त्या बंद केल्या? रस्त्यांची कामे अर्धवट झाल्यानंतर ही बंदी घालून एकप्रकारे मोठी अडचण निर्माण केली आहे. पण यासाठी हीच वेळ होती का? याआधी त्यावर बंदी का नाही घातली? याआधी त्या खाणी अनधिकृत आहेत हे माहिती नव्हते का, असा सवाल केला. यामागे राजकीय षड्यंत्र आहे. 30 मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होऊ नयेत म्हणून हे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  टुरिझम बंद करा

  रस्त्यांची कामे ही 24 ते 28 टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु आता कंत्राटदाराने प्रशासनाला कोंडीत पकडल्यानंतर रस्ते प्रमुख अभियंता मुख्यमंत्र्यांकडे गेले. रस्ते आणि नाल्यांमध्ये शिवसेनेचे टुरिझम दरवर्षीचेच आहे. हे टुरिझम बंद झाले तर रस्ते आणि नाल्यांची कामे चांगली होतील, अशी कोपरखळी सपाचे गटनेते रईस शेख यांनी शिवसेनेला मारली.

  कंत्राटदारांना पुन्हा नोटीसा

  मुंबईतील रस्ते कंत्राट कामांमध्ये ज्या कंत्राटदारांवर कारवाई केली आहे,अशा कंत्राटदारांकडूनच पुन्हा कामे करून घेतली जात आहेत. त्यांची अनामत रक्कम गोठवण्यात आली आहे. ती रक्कम त्यांना दिली जाणार नाही. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून अशाप्रकारे खडीच्या नावाखाली रस्ते कामे अडवली जात असतील तर, त्यांना पुन्हा नोटीसा पाठवल्या जातील. तसेच त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल,असे रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले. याबरोबरच जे नवीन कंत्राटदार आहेत, त्यांच्याकडूनही वेळेत काम पूर्ण केले जाणार नाही, त्यांचा परफॉर्मस काऊंट करून त्याप्रमाणे शेरा मारला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या खडीची मागणी भरपूर असून, पुरवठा कमी असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खाणमालकही ज्यांचे आगावू पैसे घेतले आहेत, त्यांनाच खडी देत असल्यामुळे खडी उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.