Advertisement

मोजोस बिस्ट्रो, वन अबाेव्हच्या मालकांची नार्को टेस्ट करा- राधाकृष्ण विखे पाटील


मोजोस बिस्ट्रो, वन अबाेव्हच्या मालकांची नार्को टेस्ट करा- राधाकृष्ण विखे पाटील
SHARES

कमला मिल येथील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबाेव्ह या दोन रेस्टॉरंटच्या मालकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देत असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असल्याने या रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांबरोबर अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

साधारणतः महिन्याभरापूर्वी कमला मिल कंपाऊडमधील मोजोस बिस्ट्रो रेस्टॉरंटला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला. तसंच या प्रकरणाची चौकशी करताना हे मोजोस बिस्ट्रो आणि त्याखाली असलेल्या वन अबाेव्ह हे रेस्टॉरंटही अनधिकृत असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून या दोन्ही रेस्टॉरंटला वेळोवेळी नोटीसा पाठविण्यात आल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


सत्ताधारी अडकण्याची शक्यता

असं असूनही दोन्ही रेस्टॉरंट तसेच सुरू ठेवल्याबद्दल या रेस्टॉरंटच्या मालकांना पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी या दोन्ही मालकांना नोटीस बजाविण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देत असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे दिवसेंदिवस याप्रकरणात नवनवी माहिती येत असल्याने यात सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि नेते अडकण्याची शक्यता असल्याने या दोन्ही मालकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी विखे-पाटील यांनी केली.

या प्रकरणी अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह महापालिकेचे १० अधिकारी व रेस्टॉरंटचे दोन मालक अटकेत आहेत. या सर्वांचीच नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा