Advertisement

महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन आणि डबे ते गुजरातला वळवतील, राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन आणि डबे ते गुजरातला वळवतील, राज ठाकरेंना टोला
SHARES

वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राजकीय वादंग पेटला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावण्यात आलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत.

"मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, असा सूचक इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे. वेदांता - फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंटं उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे, असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलंय

शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात हा विचार केला पाहिजे की, जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते? पण माणसं एकदा बेइमानीच्या उताराला लागली की त्यांना सावरणे कठीण असते. मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी त्याच बेइमानीच्या उताराला लागली आहे. त्यांचा अधःपात आता अटळ आहे, असा इशाराही 'सामना'च्या अग्रलेखात देण्यात आलाय.

सुरत- गुवाहाटी येथे बेइमान आमदार गटास शिंदे सांगत होते, ''घाबरू नका. आपल्यापाठी एक महाशक्ती आहे. आता आपल्याला हवे ते मिळेल!'' शाब्बास शिंदे! तुम्हाला हवे ते मिळाले; पण महाराष्ट्रातील लाखभर तरुणांच्या तोंडचा घास आणि रोजगार मात्र तुमच्या त्या बकासुरी महाशक्तीने ओरबाडून नेला. त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडून तुम्ही तुमच्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे.

आज एक लाख नोकऱ्या देणारा वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प या लोकांनी दुसऱ्या राज्यात जाऊ दिला. पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने कसोशीने पाठपुरावा केलेला 'बल्क ड्रग पार्क' हा आणखी एक मोठा प्रकल्पही महाराष्ट्राने गमावला आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला हा प्रकल्प आता गुजरातसह आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे. आणखी असे किती उद्योग महाराष्ट्रातून इतर राज्यांत जातील हे सध्याचे 'ईडी' सरकार आणि त्यांच्या त्या 'महाशक्ती'लाच माहीत.हेही वाचा

वेदांता प्रकरण : ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा