Advertisement

संसदेत पाठवणार होतो पण...

काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजप युतीचं घोडं गंगेत न्हालं आणि शिवसेनेच्या वाट्याला अधिकची जागा आली. पालघरची जागा शिवसेनेने अगदी हट्ट करून मागून घेतली होती. त्याचं कारणंही तसंच काहीसं होतं. पालघरची जागा म्हणजे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांची जागा.

संसदेत पाठवणार होतो पण...
SHARES

काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजपा युतीचं घोडं गंगेत न्हालं आणि शिवसेनेच्या वाट्याला अधिकची जागा आली. पालघरची जागा शिवसेनेने अगदी हट्ट करून मागून घेतली होती. त्याचं कारणंही तसंच काहीसं होतं. पालघरची जागा म्हणजे भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांची जागा. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपासून ते पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी अनेक सुविधा पोहोचवण्यासाठी चिंतामण वनगा यांनी पोटतिडकीनं प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार उभा होता.

सव्वा वर्षांपूर्वी काळानं घाला घातला. वनगा यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर पालघरची जागा रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. पंरतु शिवसेना भाजपमधील विकोपाला गेलेल्या संबंधांमुळे त्यावेळी युतीही झाली नव्हती. पोटनिवडणुकीत भाजपकडून चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली.

त्यानंतर ‘शिवबंधन’ हातावर बांधून श्रीनिवास वनगा यांनी आपला राजकारणातला प्रवास सुरू केला. त्याचवेळी कचाट्यात सापडलेल्या भाजपाचाही ‘हात’ काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी धरला आणि खऱ्या अर्थानं शिवसेना विरूद्ध भाजपा हा सामना रंगला. भाजपाने त्या निवडणुकीतही अगदी मुख्य निवडणूक असल्यासारखंच आपल्याला झोकून दिलं. इतर राज्यांचे मुख्यमंत्री, स्टार प्रचारक यांची रांगच लावली. मात्र, त्या तुलनेत शिवसेना मात्र प्रचारास कमी पडली आणि त्याचा परिणाम निकालावर दिसून आला.


यावेळी गावित यांना २,६८,१६४ मतं मिळाली. श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत असली तरी ती तितकी सोपी नव्हती याची प्रचिती त्यांनाही होती. त्यांचा अवघ्या ४४ हजार ५८९ मतांनी विजय झाला. श्रीनिवास वनगा यांनी त्यांना ‘काँटे की टक्कर’च दिली होती. त्यात वसई-विरार क्षेत्रात पसरलेल्या बहुजन विकास आघाडीनंही कमालीची मत मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

शिवसेनेला यात पराभवाला सामोरं जावं लागलं असलं, तरी मुख्य निवडणुकीत शिवसेनेनं पालघरमध्ये श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचं त्यावेळी आणि त्यानंतरही अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं होतं. परंतु २०१९ च्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देताना मात्र उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवला. यावेळीही योग्य खेळी करत भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी सर्वांच्या उपस्थितीत शिवबंधन हातावर बांधलं आणि श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीचा दिलेला शब्द हवेतच विरला.


श्रीनिवास वनगा यांनी आपण स्वत:च लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच श्रीनिवास वनगांना संसदेत पाठवायची आपली इच्छा होती. पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे. श्रीनिवास वनगा यांनी आपल्याला विधिमंडळात काम करू द्या, असं सांगितलं. त्याच्या इच्छेचा आपण आदर राखतो, त्याला कोणत्याही मार्गानं आमदार म्हणून विधिमंडळात पाठवणार असल्याचं ठाकरेंनीही सांगितलं.

काँग्रेसमधून भाजपात आणि आता भाजपामधून शिवसेनेत उडी मारणाऱ्या गावितांना उमेदवारी जाहीर होणं हे काही एका दिवसात झालं असेल असं नक्कीच नाही. यापूर्वीही शिवसेनेनं कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी युती करणार नसल्याचं प्रत्येक सभेत छातीठोकपणे सांगितलं होतं. अनेकदा शिवसेना भाजपानं एकमेकांची उणीधुणीही काढली आणि त्यानंतर युतीची घोषणा केली. त्यावेळी शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नव्हता. त्यानंतर वनगा यांच्या इच्छेचं कारण पुढं करून पुन्हा एकदा यु-टर्न मारण्याचा प्रकार करण्यात आला. गेल्या वेळच्या निवडणुकीत कशीबशी जागा आपल्या पारड्यात पडल्यानंतर यावेळी ती रिस्क घेण्याची तयारी नक्कीच या दोन्ही पक्षांची नाही. त्यामुळे इच्छेचं कारण पुढे करून वनगांना डावलण्याचा करण्यात आलेला हा प्रयत्नच म्हणावा लागेल.

पालघरमधील ही निवडणूक आता सोपी नाही. एकीकडे शिवसेना भाजप युती झाली असली तरी माकप आणि महाआघाडीनंही पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ही जागा कोणाच्या पारड्यात पडेल, हे येत्या दोन महिन्यांमध्ये स्पष्ट होईलच. सत्तेच्या हव्यासापायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारणाऱ्यांना बिनदिक्कत उमेदवारी जाहीर करण्यात येते. परंतु यात निष्ठावंतांना डावललं जातं. कोणत्याही परिस्थितीत संसंदेवर पाठवण्याच्या ‘गाजरा’नंतर आता राज्य विधीमंडळाचं ‘गाजर’ पुढं करण्यात आलं आहे. युतीची होणारी ही उमेदवारांची अदलाबदल त्यांच्यासाठी नवी नाही. सुभाष भामरे आणि सुरेश प्रभू हे त्यातलंच एक उदाहरण आहे. त्यानंतर आता संसंद आणि विधीमंडळाच्या उमेदवारीची अदलाबदल तर नाही ना असं म्हणावं लागेल. त्यातच आता या शब्दावरून तरी यु-टर्न मारला जाणार नाही ना हे आता पहावं लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा