Advertisement

रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा

मुंबईतील प्रभादेवी इथं रक्तदान करणाऱ्या मांसाहारी रक्तदात्यांना १ किलो चिकन व शाकाहारी रक्तदात्यांना १ किलो पनीर देण्यात येणार आहे.

रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. अशातच आता राजकीय नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचं आयोजित करत असून निरनिराळ्या भेटवस्तू नागरिकांना देऊन रक्तदानासाठी प्रोत्साहन करत आहेत. त्यानुसार, मुंबईतील प्रभादेवी इथं रक्तदान करणाऱ्या मांसाहारी रक्तदात्यांना १ किलो चिकन व शाकाहारी रक्तदात्यांना १ किलो पनीर देण्यात येणार आहे.

कोरोना महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळं मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची तुटवडा भासू लागला आहे. हे लक्षात घेत शिवसेनेचे नगरसेवक समाधान सदा सरवणकर यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास १ किलो चिकन देण्यात येणार आहे. रक्तदाते शाकाहारी असल्यास त्यांना १ किलो पनीर देण्यात येणार आहे.

येत्या रविवारी म्हणजे १३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर होणार आहे. त्यासाठी ११ डिसेंबरपूर्वी नोंदणी करायची असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अधिकाधिक संख्येनं लोकांनी रक्तदान करावं, एवढाच यामागचं उद्देश असल्याचंही आयोजकांचं म्हणणं आहे.

रक्तदात्यांना मिळालेल्या या ऑफरची सध्या प्रभादेवीसह मुंबईच्या कानाकोपऱ्यात जोरदार चर्चा रंगली आहे. या भन्नाट ऑफरमुळं अधिकाधिक रक्तदान होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत आयोजकांशी बातचीत केली असता, त्यांनी 'सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनामुळं नागरिक रक्तदान करण्यास राजी होत नाहीत. तसंच, रक्तदानापूर्वी कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यात बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यास विलगीकरणात जावे लागेल अशी भीतीही नागरिकांच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे बहुसंख्य मंडळी रक्तदान करण्यास तयार होत नाहीत', असं सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा