Advertisement

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी कुणाच्या सहकार्याने सत्तेत?

शिवसेना आणि राष्ट्रवादीत वरीष्ठ पातळीवर जवळीक असूनही या पक्षातील दोन नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी कुणाच्या सहकार्याने सत्तेत?
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संघर्ष अधूनमधून उफाळून येताना दिसतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वरीष्ठ पातळीवर जवळीक असूनही या पक्षातील दोन नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. 

नेमकं काय झालं?

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या आशीर्वादानेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि  उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं, असं खासदार अमोल कोल्हे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उद्देशून बोलल्यानंतर वादाला तोंड फुटलं.

 हेही वाचा- आम्ही फक्त 'त्या' व्यक्तीच्या बोलण्यालाच महत्त्व देतो, राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला

स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ

त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसंच अमोल कोल्हे यांचं आज झालं, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? असा सवालही कान्हेरे यांनी केला.

तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत याचा निर्णय शिवसेनेने घेतला आणि पुढील २५ वर्षे असंच सुरू राहील. माझ्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे वक्तव्य मान्य केले नसल्याचे स्पष्ट केलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी आता माघार घेतली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.  

या वादावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, मी संसदेत नेहमीच महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न उपस्थित केले आहेत आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीही माझे कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला पूर्ण आदर आहे आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा