Advertisement

प्रदूषण पसरवणारी एसएमएस कंपनी मुंबईबाहेर हलवण्याचा प्रस्ताव

शहरातील बायोमेडीकल कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे देवनार – गोवंडी परिसरात प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

प्रदूषण पसरवणारी एसएमएस कंपनी मुंबईबाहेर हलवण्याचा प्रस्ताव
SHARES

गोवंडीतील रहिवाशांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैवकचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. या अनुषंगाने तसंच परिसरातील प्रदुषणाबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक झाली. या बैठकीत हा प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (sms envoclean company and bio medical waste plant in govandi mumbai to be shifted at khalapur due to pollution)

समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या विनंतीवरुन या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अबू आझमी यांच्यासोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, मुंबई महापालिकेचे अधिकारी यांच्यासह एसएमएस एन्व्होक्लिन कंपनीचे संचालक आदी उपस्थित होते.

शहरातील बायोमेडीकल कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे देवनार – गोवंडी परिसरात प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सध्या कोरोनामुळे बायोमेडीकल कचरा वाढल्याने ही समस्या अधिक वाढली आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. या प्लांटचं खालापूर इथं स्थलांतर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा- अबू आझमींनी मंत्रालयात दिल्या आदित्य ठाकरेंविरोधात घोषणा

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, बायोमेडीकल कचऱ्यावर योग्य अशा वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया होणं गरजेचं आहे. पण त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा सामना लोकांना करायला नको. यासाठी प्लँटचं स्थलांतर करणं, त्यासाठी महापालिका, पर्यावरण विभाग आदींच्या परवानग्या मिळवणं आदींबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात एक सुनिश्चित आराखडा तातडीने तयार करण्यात यावा. त्यावर येत्या १० दिवसात पाठपुराव्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

आमदार अबू असीम आझमी यांनी प्रदुषणामुळे परिसरात निर्माण झालेल्या लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्येची माहिती दिली. हा प्रकल्प इथून स्थलांतरीत करण्याची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं.

गेल्याच आठवड्यात मानखुर्द, शिवाजीनगर भागात एसएमएस कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. एसएमएस कंपनीमुळे या परिसरात राहणाऱ्या सुमारे १२ लाख रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा अबू आझमी यांचा दावा आहे. परंतु ही कंपनी बंद करण्याची मागणी करत असून देखील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आमच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला होता. एवढंच नाही, तर आझमी यांनी मंत्रालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणा दिल्या तसंच मागणीचे फलकही त्यांनी झळकावले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा