Advertisement

सेन्सेक्सचा 'एक्स' फॅक्टर! नव्या वर्षात करा शेअर बाजारात गुंतवणूक

सन २०१७ मध्ये जबरदस्त कामगिरी करून भविष्यातील 'एक्स' फॅक्टरची चुणूकच सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना दाखवून दिली आहे. वर्षभरात सेन्सेक्सने २८ टक्क्यांची तर निफ्टीने २८.६५ टक्क्यांची वाढ नोंदवली असून बाजारातील काही नोंदणीकृत कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तब्बल ३३०० टक्क्यांचा रिटर्नही दिला आहे. २०१८ मध्येही हा सिलसिला कायम राहील अशी अपेक्षा आहे.

सेन्सेक्सचा 'एक्स' फॅक्टर! नव्या वर्षात करा शेअर बाजारात गुंतवणूक
SHARES

प्रत्येक प्याल्यागणिक मद्याची धुंदी चढत जावी, तशी भारतीय गुंतवणूकारांना शेअर बाजारातून मिळणाऱ्या रिटर्न्सची महती कळायला लागली आहे. मद्याचं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे शेअर बाजार हा असा प्रकार आहे, जिथं 'सेंटीमेंट्स'च्या वारूवर उधळत 'मोह' आणि 'रिस्क' फॅक्टर असे दोघेही गुंतवणूकाराला फशी पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण या दोघांवर ताबा ठेवून जो गुंतवणूकदार थोडा अभ्यास अन् थोड्या कल्पकतेच्या जोरावर घसघशीत रिटर्न्स पदरात पाडून घेतो, तोच या बाजारातला खरा 'बाजीगर' ठरतो. २०१७ मध्ये अशा अनेक 'बाजीगर' गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून चांगली कमाई केली. अशा गुंतवणूकदारांना मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने वर्षभरात अनेकदा उच्चांक गाठत चांगली साथ दिली. २०१८ मध्येही हा सिलसिला कायम राहील अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत ३४ हजारांवर असलेला सेन्सेक्स ३५ हजारांवर, तर १०, ५०० पर्यंत पोहोचलेला निफ्टी ११ हजारांपर्यंत मजल मारेल, असं जाणकार सांगताहेत.



मार्केट कॅपमध्ये भर अन् पोटेन्शिअल

सन १९७५ साली स्थापन झालेल्या मुंबई शेअर बाजारा(बीएसई) चा निर्देशांक 'सेन्सेक्स' भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो. सेन्सेक्सची कामगिरी ३० नोंदणीकृत कंपन्यांच्या वाटचालीवर आधारलेली असली, तरी सद्यस्थितीत बीएसईच्या व्यासपीठावरून ५ हजारहून अधिक कंपन्यांच्या रोखे आणि समभाग खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. त्याच आधारे बीएसईचं एकत्रित बाजारमूल्य ( मार्केट कॅप ) १, ४६, ३१, ६२३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे आणि त्यात सातत्याने भरच पडत आहे.



बाजारमूल्याच्या आधारे बीएसईचा देशात पहिला तर जगात ११ वा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ५० नोंदणीकृत कंपन्यांवर आधारीत राष्ट्रीय शेअर बाजारा(एनएससी) च्या 'निफ्टी'चा क्रमांक येतो. त्यामुळेच तर भाजपाप्रणित रालोआ सरकारने आर्थिक सुधारणांचा धडाका लावताच सेन्सेक्स आणि निफ्टी उसळी खाऊ लागले. सरकारच्या सकारात्मक निर्णयाने नवनवे उच्चांक गाठू लागले, तर कधी अपेक्षित परिणाम हाती न आल्यास निराशेने आपटलेसुद्धा. या आपटीतही महागाई, नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय वगळता बहुतांश जागतिक घडामोडींचाच अधिक परिणाम राहिला.



उसळणारं वर्ष

उच्चांक गाठण्याच्या बाबतीत सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी २०१७ हे वर्ष खूपच सकारात्मक ठरलं. या वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने एकत्रितरित्या किमान एक डझनहून अधिक वेळा आपलाच विक्रम मोडीत काढला. वर्षभरात सेन्सेक्सने२८ टक्क्यांची तर निफ्टीने २८.६५ टक्क्यांची वाढ नोंदवली असून बाजारातील काही नोंदणीकृत कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तब्ब ३३०० टक्क्यांचा रिटर्नही दिला आहे.


टप्प्याटप्प्याने वाढ

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करताच ४ मार्च २०१५ मध्ये सेन्सेक्सने पहिल्यांदा ३०,००० चा आकडा गाठला होता. त्यानंतर ३० हजारांच्या पलिकडे झेप घ्यायला सेन्सेक्सला तब्बल २ वर्षे लागली. २६ एप्रिल २०१७ मध्ये सेन्सेक्सने ३० हजार अंकांच्या पलिकडे जात ३०, १३३.३५ हा नवा उच्चांक स्थापन केला.

त्यापाठोपाठ २६ मे २०१७ ला सेन्सेक्सने ३१, ०७४.०७ असा उच्चांक गाठला. तर १३ जुलै २०१७ ला सेन्सेक्सने ३२, ०३७.३८ पर्यंत मजल गाठली. २५ ऑक्टोबर २०१७ ला सेन्सेक्सने ३३, ०४२.५० चा पल्ला गाठला आणि २६ डिसेंबर २०१७ ला ३४, ०१०.६२ असा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना अवघ्या काही मिनिटांत मालामाल करून टाकलं.
जून महिन्यांत ३०, ९५८.२५ वर असलेला सेन्सेक्स अवघ्या ६ महिन्यांत ४ हजारांनी तर वर्षभरापूर्वी २९ डिसेंबर २०१६ रोजी २६,१६६.६७ वर असलेला सेन्सेक्स ८ हजारांनी वाढून ३४ हजारांवर आला आहे.
एनएसईच्या निफ्टीच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. वर्षभरापूर्वी ८ ते ९ हजारांदरम्यान गटांगळ्या खात असलेला निफ्टीही १०,५०० चा जादुई आकडा गाठू लागला आहे.



या झेपेत दडलंय काय?

शेअर बाजाराची ही झेप केवळ नोंदणीकृत कंपन्यांपुरती किंवा त्यात समभाग, रोख्याच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपुरतीच मर्यादीत नाही. तर ही झेप भारतीय अर्थव्यवस्था येत्या काळात किती सक्षमपणे भरारी घेईल, हे सप्रमाण दाखवून देणारी आहे. 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अॅण्ड बिझनेस रिसर्च' या लंडनमधील आर्थिक सल्लागार संस्थेने नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार भलेही नोटाबंदी आणि जीएसटीचा झटका खाऊन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने तीन वर्षांतील निच्चांक नोंदवला असला, तरी सद्यस्थितीत ७ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये युनायटेड किंगडम (यूके) आणि फ्रान्सला पिछाडीवर टाकत ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे.

तर २०३२ मध्ये चीन, अमेरिकेपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था म्हणून सर्वांनाच आश्चर्यचकीत करणार आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेला पाठबळ देणाऱ्या शेअर बाजाराचा वाटाही मोठा राहणार आहे. कारण दोन वर्षांपूर्वीच फुगा फुटावा तसा चीनच्या शेअर बाजारातील हवा जाताना साऱ्या जगाने पाहिली आहे. तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याजोरावर शेअर बाजार संथगतीने का होईना, पण आश्वासक वाटचाल करत आहे. ही जागतिक गुंतवणूकदारांना देखील आश्वासक वाटणारी बाब आहे.



गुंतवणूकदारांचा बदलता कल

शिवाय ही झेप कालानुरूप गुंतवणूकदारांचा बदलणारा कल देखील अधोरेखीत करणारी आहे. आयुष्यभर नोकरीधंदा करून रिटायर झालेला एखादा बुजूर्ग आपली सारी कमाई एखाद्या बँकेत 'फिक्स्ड डिपॉझिट'मध्ये किंवा पोस्टाच्या 'सिनियर सिटीझन सेव्हींग स्किम'मध्ये जमा करत असे. ही व्यक्ती म्हणजेच आपल्याकडील सर्वात जुना गुंतवणूकदार. पण जसाजशा देशभरात नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध होऊ लागल्या, तरूणांच्या हाती पैसा खुळखुळू लागला. तसतशी देशातील गुंतवणूकदाराची वयोमर्यादा साठीतून यू टर्न घेऊन विशी-तिशीत आली. एका अर्थाने जवान झाली. तर दुसरीकडं सेन्सेक्सही तिशीची पायरी ओलांडून प्रौढ झाला आहे. सोनं, बँकेचे एफडी, प्रॉपर्टी आणि शेअर बाजार अशा विविध पर्यायांमध्ये हे तरूण गुंतवणूकदार गुंतवणूक करू लागलेत. त्याचा सहाजिकच शेअर बाजारालाही फायदा होऊ लागला आहे.


सरकारचा 'छुपा' अजेंडा

सोबतच ''सिधी उंगलीसे घी नही निकला, तो उंगली तेढी करनी पडती है'' याची सरकारला जाणीव असल्याने देशातील गुंतवणूकदारांची पारंपरिक गुंतवणुकीची सवय मोडीत काढण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक पावलं उचलायचा सुरूवात केली. या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात का होईना, पण यश येत असल्याचं दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो 'स्मॉल सेव्हींग स्कीम'चा. भारतीय पारंपरिक गुंतवणूकदार 'स्मॉल सेव्हींग स्कीम'मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेत या योजनांच्या व्याजदरांमध्ये पद्धतशीरपणे कपात करण्याचा सपाटा सध्या सरकारने लावला आहे. यामुळे पारंपरिक गुंतवणूकदार चिंतीत आले असले, तरी सरकार या व्याजदरांमध्ये पुढेही कपात सुरूच ठेवणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जितक्या लवकर नवा अर्थात 'शेअर बाजारा'चा पर्याय स्वीकारतील, तितकाच त्यांना या पॉझिटीव्ह सेंटीमेंट्चा फायदा मिळवता येईल.



सरकारने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यानुसार पब्लिक प्रॉव्हीटंड फंड(पीपीएफ) मध्ये ०.२ टक्क्यांची कपात करून पीपीएफ आणि नॅशनल सेव्हींग सर्टीफिकेट(एनएससी) चे व्याजदर ७.८ टक्क्यांवरून ७.६ टक्क्यांवर आणले आहेत. सिनियर सिटीझन स्कीमचे व्याजदर ८.३ टक्क्यांवर तर किसान विकास पत्र (केव्हीपी) चे व्याजदर ७.३ टक्क्यांवर आणले आहेत. सुकन्या समृद्धी स्कीमचे व्याजदरही ८.३ टक्क्यांवरून ८.१ टक्के करण्यात आले आहेत. सोबत दीड वर्षांच्या मुदत ठेवीचे व्याजदरही ७.४ टक्क्यांवरून थेट ६.६ टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. सर्व बँकांच्या सेव्हींग अकाऊंटवर वार्षिक ४ टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहेत.


दबाव का?

बँकांनी कर्जाचे व्याजदर कमीत कमी ठेवावेत यासाठी केंद्र सरकार पाच सदस्यीय मॉनिटरींग कमिटी स्थापन करून रिझर्व्ह बँकेसह देशभरातील बँकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बँका सद्यस्थितीत मुदत ठेवींवर ६.२५ ते ७.४५ टक्के असलेले व्याजदर आणखी कमी करण्याची दाट शक्यता आहे.


फायदा कुठे?

याउलट कंपन्यांचे रोखे वा समभाग थेट खरेदी करण्यासोबत म्युच्युअल फंड आणि 'सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान' (एसआयपी)मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाणही मागील काही वर्षांमध्ये कमालीचं वाढलं आहे. यामागचं सरळ सोपं कारण म्हणजे 'स्मॉल सेव्हींग स्कीम्स'च्या तुलनेत मिळणारा घसघशीत परतावा. साधारणत: १ ते ३ वर्षांच्या किंवा ३ ते ५ वर्षांच्या दीर्घ अवधीच्या योजनांमध्ये १२ ते १७ टक्के परतावा मिळत असल्याने (रिस्क फॅक्टरनुसार) तरूण गुंतवणूकदार जोखीम पत्करून या नव्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.



पारदर्शकपणाचा परिपाक

पूर्वी शेअर बाजार म्हटलं की हर्षद मेहताचा शेअर बाजार घोटाळाच सर्वसामान्यांच्या डोळ्यापुढे यायचा. त्यामुळे 'शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे हमखास फसवणूक' हे वाक्यही अनेकांच्या तोंडपाठ झालं होतं. पण भांडवली बाजार नियामक प्राधिकरण (सेबी)ने अत्यंत प्रयत्नपूर्वक शेअर बाजाराची प्रतिमा पारदर्शक करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांमध्ये केला. त्याचाच परिपाक म्हणजे सर्वसामान्यांची शेअर बाजारात वाढलेली गुंतवणूक होय. पॉन्झी स्कीम्सला अटकाव घालणं असो की सातत्याने जनजागृती करून ग्राहकांना सतर्क करण्याचं काम असो, सेबी हे काम अत्यंत उत्तमपणे बजावत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट, नादारी आणि दिवाळखोरी कायदा करून केंद्र सरकार देखील गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडत आहे.


येणारं वर्ष कसं?

सध्या ऑलटाईम हाय असलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करायला काही गुंतवणूकदार बिचकत आहेत. पण अचूक थोडं अभ्यास करून शेअर निवडल्यास चांगला परतावा मिळू शकतो. कारण २०१८ मध्ये भारताचा जीडीपी ८ टक्क्यांच्या जवळपास राहील असं म्हटलं जात आहे. तर महागाईचा दर ३ ते ४ टक्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून २५ ते ५० बेसिस पॉईंट रेपो रेट कपातीची शक्यता असेल. या सर्वांचा परिणाम म्हणजे सध्या ३४ हजारांवर असलेला सेन्सक्स वाढून ३५ हजारांवर तर १०,५०० पर्यंत असलेला निफ्टी वधारून ११ हजारांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.



नवीन वर्षांत गुंतवणूक करताना

शेअर बाजार मजबूत दिसत असल्याने गुंतवणुकीसाठी पैसा सहजतेने उपलब्ध होत आहे. पण तो वापरताना जपून वापरणं गरजेचं आहे. खासकरून नवीन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना खालच्या स्तरावरील स्टॉकमध्ये गुंतवणूक उत्तम. कारण त्यातूनच चांगल्या रिटर्न्सची संधी उपलब्ध होऊ शकते. ज्या कंपन्यांचा ग्रोथ रेकॉर्ड चांगला आहे आणि यापूर्वी ज्या कंपन्यांनी चांगला रिटर्न्स मिळवून दिला आहे, अशा फंडामेंटली स्ट्राँग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकेल.


गुंतवणुकीला मर्यादा नाही

इथं तुमच्या गुंतवणुकीला कुठल्याच मर्यादा नाही. तुम्ही सोन्यात गुंतवणूक करा, करन्सीमध्ये करा किंवा कमोडिटी मार्केटमध्ये करा. रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा, बँकांचे, आयटी वा फार्मा कंपन्यांचे शेअर विकत घ्या. रिस्क फॅक्टर कमी ठेवायचा असेल, तर खासगी कंपन्यांऐवजी सरकारी कंपन्या, योजनांमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला कुणीच अडवणार नाही. थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नसेल, तर म्युच्युअल फंडाचा पर्याय आहेच.

  • नवीन गुंतवणूकदारांनी आकर्षक सेक्टरमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या कंपनीचीच निवड करावी
  • ज्या कंपनीची 'बॅलन्सशीट' मजबूत असेल आणि 'डेट ऑफ इक्विटी रेशो' कमी असेल अशा कंपनीची निवड करावी, जेणेकरून गरज भासल्यास कंपनी सहजतेने बाजारातून रक्कम उभी करू शकेल.
  • एकाच कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक करण्याऐवजी पर्यायी कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करावी. जेणेकरून एखाद्या गुंतवणुकीतून फटका बसल्यास त्याची रिकव्हरी इतर कंपन्यातील गुंतवणुकीतून होऊ शकेल.



काही का असेना भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक सद्यस्थितीत ज्या तऱ्हेने उसळी घेत आहेत, त्यासारखी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या खात्यातील गंगाजळी उसळी घेऊ लागल्यास भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने सक्षम झाली, असं म्हणता येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा