मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम

मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम
मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम
मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम
See all
मुंबई  -  

पालकांनो सावधान... तुमची मुले मोबाईल आणि गेम्सच्या आहारी गेली आहेत? मग हे नक्की वाचा. असा एक ऑनलाईन गेम आहे जो तुमच्या मुलाचा जीव देखील घेऊ शकतो. तुमच्या मुलांना आत्महत्या करण्यास हा गेम प्रवृत्त करू शकतो. धक्का बसला ना हे वाचून? पण हे खरे आहे. 'ब्ल्यू व्हेल' असे या गेमचे नाव असून हा गेम ऑनलाईन खेळला जातो. युके, रशिया आणि चायना, ब्राजील आणि अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा गेम मुंबईत तरूणांच्या जिवावर उठला आहे.


सौजन्य


मुंबईत 'ब्ल्यू व्हेल' गेमचा पहिला बळी?


मुंबईत सुद्धा या गेमने हळूहळू आपले हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. अंधेरीतल्या मेघवाडी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेतली. मनप्रीत सिंग असे या मुलाचे नाव आहे. ब्ल्यू व्हेल ( Blue Whale ) हा ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जातोय. मनप्रीत टॅरेसच्या कट्ट्यावर उभा राहून सेल्फी व्हीडिओ काढत असल्याचे बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या मुलाने पाहिल्याचे बोलले जाते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंदवला आहे. पण सध्या ब्ल्यू व्हेल या गेमचे नाव समोर येत आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करत आहोत. सध्या त्याचे पालक बाहेर गेले आहेत. ते आले की त्यांचा जबाब नोंदवला जाईल. सध्या त्याच्या मित्रांचा आम्ही जबाब नोंदवत आहोत.”

-मिलिंद खेतले, सहाय्यक पोलीस आयुक्त, मेघवाडी

अंधेरीतल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये मनप्रीत ९व्या इयत्तेत शिकत होता. आई-वडिल आणि दोन बहिणी असे त्याचे कुटुंब होते. मनप्रीतचे स्वप्न पायलेट होण्याचे होते. त्यासाठी त्याला रशियाला जायची इच्छा होती. पण त्याचे स्वप्न आता स्वप्नच राहिले.


काय आहे 'ब्ल्यू व्हेल' गेम?


सोशल मीडियावर ऑनलाईन 'देथ ग्रुप' नावाने देखील हा गेम ओळखला जातो. 'ब्ल्यू व्हेल' गेममध्ये प्लेअर्सना ५० वेगवेगळे टास्क दिले जातात. हे सर्व टास्क ५० दिवसात पूर्ण करावे लागतात. तसेच टास्क पूर्ण केल्याचा पुरावा देण्यासाठी फोटो किंवा व्हीडिओ पाठवावा लागतो. गेममध्ये प्लेअर्सना एक ट्रेनर दिला जातो. पुढचे ५० दिवस प्लेअर्सना हा ट्रेनर नियंत्रित करत असतो. ट्रेनरच्या सांगण्यावरून मुले टास्क पूर्ण करतात. एकदा गेम सुरू केला की तुम्ही त्यातून बाहेर नाही पडू शकत. इंग्लंडच्या एका वेबसाईटनुसार, जर प्लेअर्सने टास्क पूर्ण केले नाही तर त्यांना धमकीचे मेसेज येतात. हा गेम ग्रुपने देखील खेळला जातो. मध्यरात्री उठून एखादा हॉरर मुव्ही बघणे किंवा स्वत:ला जखमी करून घेणे, असे टास्क दिले जातात. त्यानंतर आत्महत्या करणे, या खेळाचा शेवटचा टप्पा असतो.'ब्ल्यू व्हेल' गेममधील टास्क


 • सकाळी ४.२० वाजता उठून हातावर वार करणे
 • सकाळी ४.२० वाजता उठून हॉरर चित्रपट पाहणे
 • हाताच्या नसा कापून घेणे
 • हातावर ब्लेडने व्हेलचे चित्र काढणे
 • ओठ कापणे
 • रात्री न झोपणे
 • टॅरेसच्या कट्ट्यावर उभे राहणे किंवा बसणे
 • टॅरेसवरून उडी मारणे


अशा प्रकारचे ५० टास्क दिले जातात. प्लेअर्सच्या जिवाचे नुकसान होईल, असे हे टास्क असतात. हे टास्क पूर्ण करण्यासाठी मुले कोणत्याही थराला जातात. त्यामुळे ब्ल्यू व्हेल हा आजपर्यंतचा सर्वात घातक असा गेम ठरला आहे.


फक्त ब्ल्यू व्हेलच नाही तर असे अनेक गेम्स आहेत जे मुलांसाठी घातक आहेत. ब्ल्यू व्हेल या गेम संदर्भात बोलायचे झाले तर हा गेम रशियात बनवला गेला आहे, असे बोलले जाते. याप्रकरणी रशियातून एकाला अटक केल्याचे सुद्धा बोलले जात आहे. ब्ल्यू व्हेल हा गेम खेळायला सुरुवात केली की तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. मुले या गेमच्या आहारी जातात की, दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत. सूसाईड गेम नावाने सुद्धा हा गेम ओळखला जातो. या गेमला थांबवणे कठिण आहे. यावर एकच उपाय म्हणजे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे.”

-विजय मुखी, सायबर एक्सपर्ट


सौजन्य


अनेक देशांमध्ये ब्ल्यू व्हेलने धुमाकूळ घातला आहे. रशिया, यूनायटेड स्टेट्स, आफ्रिका, अर्जेंटिना अशा अनेक देशांमध्ये ब्ल्यू व्हेल या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. या गेममुळे रशियात १०० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.


'ब्ल्यू व्हेल' गेमपासून कसे ठेवाल मुलांना लांब?


 • मुलगा कोणता गेम खेळतोय किंवा कोणत्या ऑनलाईन ग्रुपसोबत चॅट करत आहेत? यावर लक्ष ठेवा
 • आई आणि वडिलांनी मुलांशी संवाद साधावा
 • संवाद साधावा याचा अर्थ त्यांना ओरडावे हा होत नाही. त्यांचाशी प्रेमाने बोला.
 • मुले काय बोलत आहेत किंवा काहि सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
 • मित्रांच्या दबावाकाली येऊन 'हो' म्हणू नका. चुकिच्या गोष्टींना 'नाही' बोलाा, हे मुलांना पालकांनी सांगितले पाहिजे
 • मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टींची समज करून देणे


आजची तरुणाई मोबाईल आणि व्हीडिओ गेम्सच्या अक्षरश: आहारी गेली आहेत. गेल्यावर्षी आलेल्या पोकिमॉन गो या खेळाने देखील अनेकांना याड लावले होते. कित्येकांने या गेममुळे आपला जीव गमावला होता आणि आता ब्ल्यू व्हेल हा गेम मुलांच्या जिवावर उठला आहे. विरंगुळा म्हणून मुले हा गेम खेळत आहेत. पण हा गेम तुमच्या मुलांच्या जीवाशी तर खेळत नाही ना? यावर देखील पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.