
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या मोसमात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली संघाच्या फिजिओनंतर एका खेळाडूचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दिल्ली संघाला पुण्याला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण टीमला मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
दिल्लीला पुढचा सामना २० एप्रिलला पंजाब किंग्जसोबत पुण्यात खेळायचा आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, फिजिओनंतर एका खेळाडूची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
१६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. मात्र, त्यांच्याशिवाय कोणत्याही खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. त्यानंतर १६ एप्रिलला दिल्लीचा संघ बंगळुरूविरुद्ध मैदानात उतरला.
दिल्ली कॅपिटल्सच्या फिजिओची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून १६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना एकमेकांना मिठी मारण्यास आणि हस्तांदोलन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं होतं.
गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात ३ दिवसांत ३ संघांचे ४ खेळाडू, २ प्रशिक्षक आणि २ इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल केवळ २९ सामन्यांनंतर थांबवण्यात आले होते. नंतर, आयपीएलचे उर्वरित ३१ सामने ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले.
हेही वाचा
