Advertisement

लक्ष्य नेमबाजी स्पर्धेत दीपक कुमारचा सुवर्णवेध


लक्ष्य नेमबाजी स्पर्धेत दीपक कुमारचा सुवर्णवेध
SHARES

माजी अाॅलिम्पियन सुमा शिरूर यांच्या लक्ष्य शूटिंग क्लबने पनवेल येथील जागतिक दर्जाच्या कर्नाळा स्पोर्टस अकादमीत शुक्रवारी झालेल्या लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धेत भारतीय वायुदलाच्या दीपक कुमारने सुवर्णवेध घेतला. गुरु द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजय चक्रवर्ती यांना समर्पित केलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना १.६५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात अाली. सिनियर गटातील विजेत्या दीपक कुमारला ५० हजार रुपयांचे इनाम देऊन गौरवण्यात अाले.


अंजूमचे जेतेपदाचे स्वप्न भंगले

प्राथमिक फेरीत दीपक कुमार (६२६.४) गुणांसह अाघाडीवर होता. प्राथमिक फेरीत ६२२ गुण पटकावणाऱ्या अंजूम अाणि दीपक यांच्यात २३व्या शाॅटच्या अखेरीस २३७ अशी बरोबरी होती. मात्र दीपकने अंतिम फेरीत २४८.५ गुण पटकावत विजेतेपदावर नाव कोरले. अंजूमला २४८.३ गुणांवर समाधान मानावे लागले. अंजूमने दुसरे तर राजस्थानच्या सिम्रात चहल हिने तिसरे स्थान प्राप्त केले.


ज्युनियर गटात शाहू माने ठरला विजेता

पुण्याच्या वेध अकादमीच्या शाहू माने याने ज्युनियर गटात विजेतेपदाचा मान पटकावला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीच्या विनय कुमार पाटील अाणि नुपूर पाटील यांनी अनुक्रमे दुसरे अाणि तिसरे स्थान प्राप्त केले. ज्युनियर गटातील विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार अाणि १० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात अाले. गुरु संजय चक्रवर्ती, अाॅलिम्पियन नेमबाज अंजली भागवत अाणि दिपाली देशपांडे तसेच नवी मुंबईचे पोलीस अायुक्त हेमंत नागराळे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात अाले.


हे ठरले विशेष पुरस्काराचे मानकरी

स्पर्धेमध्ये काही विशेष पुरस्कारही देण्यात आले. त्यात सर्वाधिक ५४ दहा इनर मारल्याबद्दल दीपक कुमारला, सर्वाधिक १०.९चे चार लक्ष्यवेध करणाऱ्या तेजस प्रसादला आणि १०५.४ ची सर्वोत्तम सिरीज मारणाऱ्या अखिल शेराॅनला प्रत्येकी ५ हजाराचे इनाम प्राप्त झाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा