Advertisement

राष्ट्रीय ज्युनियर खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट


राष्ट्रीय ज्युनियर खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
SHARES

मणिपूर इथं झालेल्या ३७ व्या ज्युनियर गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपदावर नाव कोरलं. कुमार गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं कोल्हापूरचं कडवं आव्हान २४-१९ असं ५ गुणांनी मोडून काढत विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या बलाढ्य संघानं पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकला ८-४ असे १ डाव व ४ गुणांनी चारीमुंड्या चीत करून अजिंक्यपद मिळवित आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महाराष्ट्राच्या कुमार संघाचं हे सलग १३ वं तर मुलींचं सलग चौथं विजेतेपद आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा मानाचा 'वीर अभिमन्यू पुरस्कार' महाराष्ट्राच्या शुभम उतेकरनं तर मुलींमधील 'जानकी पुरस्कार' महाराष्ट्राच्या कोमल दारवटकरनं पटकावला.



कोल्हापूरची कडवी लढत

मुलांच्या सामन्यात कोल्हापूरच्या संघानं मध्यंतरापर्यंत छान लढत दिली मात्र उत्तरार्धात त्यांचं आव्हान फिकं पडलं. दुसऱ्या डावातील आक्रमणात महाराष्ट्रानं कोल्हापूरचे १३ गडी टिपून सामना आपल्या बाजुने झुकवला. महाराष्ट्राच्या शुभम उतेकरने दुसऱ्या डावात २ मिनिटे संरक्षण करून संपूर्ण सामन्यात संघासाठी ७ गुणांची कमाई केली. वृषभ वाघने दुसऱ्या डावात २.२० मिनिटे संरक्षण केले. निहार दुबळेने १.५० मि संरक्षण करून ४ गडी बाद केले.


कोमल दारवटकरची चमक

महाराष्ट्राच्या मुलींनी एक डाव अाणि ४ गुणांनी हा सामना सहज जिंकला. महाराष्ट्राच्या विजयात कोमल दारवटकर (४.२० मि व ३.१० मि नाबाद), रेश्मा राठोड (२ मि, २.४० मि व २ गडी), अपेक्षा सुतार (२.४० मि नाबाद) व प्रियांका इंगळे (३.१० मि व १ गडी) यांचा मोलाचा वाटा होता.


हेही वाचा -

'खेलो इंडिया' खो-खो स्पर्धेत दिल्लीत घुमला महाराष्ट्राचा अावाज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा