SHARE

४१ वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या बलाढ्य मुंबईवर यंदा उपांत्यपूर्व फेरीतच गारद होण्याची नामुष्की अोढवली अाहे. विशेष म्हणजे ८ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकने एक दिवस शिल्लक राखून मुंबईला एक डाव अाणि २० पराभूत करत उपांत्य फेरी गाठली अाहे. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात मुंबईवर पाचव्यांदा डावाने पराभूत होण्याची वेळ अाली अाहे.


विनय कुमारच्या हॅटट्रिकमुळे मुंबईचा पहिला डाव अवघ्या १७३ धावांवर संपुष्टात अाला होता. त्यानंतर कर्नाटकच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत पहिल्या डावात धावांचा डोंगर रचला होता. कर्नाटकने ५७० धावा उभारत पहिल्या डावात ३९७ धावांची भलीमोठी अाघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात मुंबईने कडवी लढत दिली खरी, पण दुसरा डाव ३७७ धावांवर संपुष्टात अाणत कर्नाटकने उपांत्य फेरीत प्रवेश केला.


सूर्यकुमारचे खणखणीत शतक

पृथ्वी शाॅ, अखिल हेरवाडकर अाणि जय बिश्त या मुंबईच्या अाघाडीच्या तीन फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केल्यानंतर सूर्यकुमार यादव मुंबईसाठी धावून अाला. त्याने अाकाश पारकरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भर घालत कर्नाटकला विजयापासून रोखून धरले. सूर्यकुमारने १६ चौकार अाणि १ षटकारासह १०८ धावांची खेळी करत अापले शतक साजरे केले.


विनय कुमारचा भेदक मारा

पहिल्या डावात हॅटट्रिकसह सहा विकेट्स टिपणाऱ्या विनय कुमारने पुन्हा एकदा भेदक मारा करत मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केले. मैदानावर स्थिरावलेल्या सिद्धेश लाडला (३१) गौतमकरवी झेलबाद केल्यानंतर विनय कुमारने मुंबईचा कर्णधार अादित्य तरेला शून्यावर पायचीत पकडत मुंबईची मधली फळी उद्ध्वस्त केली. त्यानंतर कृष्णप्पा गौतम याने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत मुंबईचा दुसरा डावही संपुष्टात अाणला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या