Advertisement

मुंबई, ठाण्याचे दोन्ही संघ राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत


मुंबई, ठाण्याचे दोन्ही संघ राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत
SHARES

चिपळूण येथील जोशी मैदानात सुरू असलेल्या ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे तर मुलींमध्ये मुंबई, ठाणे या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला अाहे.



मुंबईच्या शुभम शिगवणचा अष्टपैलू खेळ

कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव अाणि १२ गुणांनी धुव्वा उडवत विजयी घोडदौड कायम ठेवली. शुभम शिगवण (२.४० मि., २ मि. व ४ गडी), आयुष गुरव (५ गडी), जितेश नेवाळकर (३.२० मि. व ३ गडी) व सनी तांबे (४ गडी) यांनी सुरेख खेळ करत मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या ठाण्याने उस्मानाबाद संघावर १३-१० अशी ३ गुणांनी डावात मात केली. मुंबई उपनगरच्या कुमार संघाने यजमान रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी डावाच्या फरकाने मात करीत संषुष्टात आणले. उपनगरच्या विजयात कर्णधार निहार दुबळे (२.५० मि व ३ गडी), सिद्धेश थोरात (३.४० मि) व अक्षय कदम (४ गडी) यांचा महत्त्वाचा वाटा होता.


ठाण्याच्या मुलींचीही विजयी अागेकूच

मुलींच्या गटात वैष्णवी परब (४.३० मि), सायली म्हैसधुणे (३.३० मि) व शिवानी गुप्ता (५ गडी) यांच्या चतुरस्त्र खेळामुळे मुंबईला धुळ्यावर २४- ८ असा १ डाव व १६ गुणांनी सहज विजय संपादन करता आला. ठाण्याच्या मुलींच्या संघाने औरंगाबादचा १०-५ असा १ डाव व ५ गुणांनी पराभव केला, ठाण्याच्या रेश्मा राठोड (३.४० मि नाबाद), गीतांजली नरसाळे (३.३० मि.) व वृत्तिका सोनावणे (३ गडी) यांनी सुंदर खेळ केला. अतिशय रंगतदार सामन्यात यजमान रत्नागिरीने मुंबई उपनगरचा (४-४,६-६,७-३) १७-१३ असा ४ गुणांनी जादा डावात पराभव करून उपउपांत्य फेरी गाठली. उपनगरच्या आरती कदमचे ( २.२० मि., १.५० मि, १.५० मि व ६ गडी) प्रयत्न निष्फळ ठरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा