Advertisement

शंभर नंबरी मॅरेथॉनपटू, १०० दिवसांत धावला १० हजार किमी


शंभर नंबरी मॅरेथॉनपटू, १०० दिवसांत धावला १० हजार किमी
SHARES

आंतरराष्ट्रीय ट्रॅकमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट, अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन किंवा 'फ्लाईंग शीख' अशी उपाधी लाभलेले ज्येष्ठ भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांनी असंख्य नवोदित धावपटूंना प्रेरणा देत आव्हानांचे अडथळे पार करून विजय संपादन करायला शिकवले.

हे तर झाले आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू; पण मुंबईतही असा एक धावपटू आहे, ज्याने १०० दिवसांत तब्बल १० हजार किलोमीटर धावण्याचा विक्रम रचत असंख्य नवोदीत धावपटूंचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्येत बिघडल्याने १० हजार किमीचा टप्पा पार करण्यास त्यांना ३५ किमी कमी पडले हे दुर्दैवी. पण याने त्यांचा पराक्रम किंचीतही कमी होणारा नाही. या धावपटूचे नाव आहे समीर सिंह (४४). खारमध्ये राहणाऱ्या समीर सिंह यांनी खडतर मेहनत आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर ही अचाट कामगिरी करून दाखवली आहे.


असा केला भीष्मपराक्रम

मुळात १० हजार किमी धावण्याचा भीष्मपराक्रम करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. काश्मीर ते कन्याकुमारी तीनदा पार करण्याएवढे हे अंतर आहे. पण समीर सिंह यांनी योग्य सराव, आहार आणि इच्छाशक्ती यांचा अचूक ताळमेळ साधत हे लक्ष्य पूर्ण केले.

केवळ १०० दिवसांत हे लक्ष्य गाठण्यासाठी दररोज १०० किमी धावायचे असा शिरस्ता त्यांनी ठेवला होता. त्यासाठी समीर खार ते मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्राईव्ह ते खार असे सलग धावायचे. १०० किमी अंतर झाले की थांबायचे. ऊन असो, पाऊस असो, खराब रस्ते किंवा ट्रॅफिकची समस्या, अशा कुठल्याही अडथळ्यांना न जुमानता ते सलग १०० दिवस धावत राहिले.



२९ एप्रिल रोजी सुरू केलेली ही शर्यत त्यांनी ६ ऑगस्ट रोजी पूर्ण केली. या शर्यतीत त्यांना टक्कर द्यायला एकही धावपटू सोबत नव्हता. पण जसजसा ते शर्यतीतील महत्त्वाचा टप्पा गाठत गेले. तसतशी त्यांना प्रेरणा म्हणून त्यांच्यासोबत धावणाऱ्यांची संख्याही वाढत गेली.

समीर मूळचे मध्य प्रदेशातील एका गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेले. प्रोफेशन धावपटू म्हणजे काय त्यांना माहितही नव्हते. पण २००४ मध्ये ते गुजरातमधील सर्वेक्षण कंपनीत कामाला लागले. ही कंपनी मॅरेथॉनबद्दलचे सर्वेक्षण करायची. कामाचा भाग म्हणून समीर देखील समाजातील विविध स्तरातील रहिवाशांची भेट घेत, त्यांना मॅरेथॉनबद्दलचे प्रश्न विचारायचे. तेव्हापासून त्यांची मॅरेथॉनबद्दली उत्सुकताही कमालीची वाढली. त्यांनीही मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचे ठरवले.




अशी झाली सुरूवात

वयाच्या ३५ व्या वर्षी २००९ मध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉनसाठी तयार केली. पण काही अडचणींमुळे त्यांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता आले नाही. मात्र पुढील दिल्ली मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर २०१० मध्ये ते मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. तेथून पुढे देशातील महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले.


या स्पर्धांवर कोरले नाव

मॅरेथॉन खेळाडू म्हणून नावलौकीक मिळवलेले समीर यांनी आतापर्यंत वडोदरा अल्ट्रा मॅरथॉन, सिल्वासा मॅरथॉन आणि मुंबई अल्ट्रा मॅरथॉन २०१५ आणि २०१६ चे विजेतेपद पटकावले आहे. आठ वर्षांपूर्वी मुंबईला स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी धावपटूंचे प्रोफेशनल ट्रेनर म्हणून काम करायला सुरूवात केली. धावपटूंना मार्गदर्शन करतानाच त्यांना १०० दिवसांत १० हजार किमी धावण्याचा विक्रम करण्याची कल्पना सुचली.



भावंडांनी आणले प्रकाशझोतात

विशेष म्हणजे समीर यांनी हा विक्रम रचताना कुठल्याही कंपनी वा संस्थेची मदत घेतलेली नाही. या विक्रमासाठी लागणारा सर्व खर्च त्यांनी स्वत:च पेलला आहे. वंदना भाटी या मॅरेथॉन धावपटूने काही दिवसांपूर्वी समीर यांना धावताना बघितले. त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी समीर यांच्याशी संवाद साधला असता समीर यांच्या पराक्रमाची माहिती त्यांना झाली. हा रेकॉर्ड सर्वांसमोर यावा म्हणून त्यांनी आपला भाऊ विक्रम याची मदत घेतली.   

या दोघांनी मिळून समीर यांचे यश जगासमोर ठेवण्यासाठी 'द फेथ रनर' नावाने फेसबुक पेज तयार केले. या पेजद्वारे त्यांनी समीर यांना प्रकाशझोतात आणले. या विक्रमाने असंख्य नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे विक्रम भाटी यांनी यावेळी सांगितले.


असा होता दिनक्रम :

  • पहाटे सकाळी ४ वाजता उठणे
  • फ्रेश होऊन नाश्ता घेणे
  • पहाटे ५ ते दुपारी १ पर्यंत धावणे
  • पहिल्या सेशनमध्ये किमान ६० ते ७५ किमी धावणे
  • १ ते ३ यावेळेत जेवण, विश्रांती
  • दुसरे सेशन सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत
  • या सेशनमध्ये ४० ते २५ किमी धावणे
  • खार ते मरीन ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह ते खार असा मार्ग



असा होता आहार :

  •  उठल्यावर १-२ लीटर पाणी आणि सुकामेवा
  • तीन तास धावल्यानंतर नारळ पाणी
  • पुन्हा दोन तास धावल्यानंतर एक प्लेट इडली आणि पाणी
  • दुपारच्या जेवणात डाळ भात, उकडलेले बटाटे, चणे
  • थोडा आराम करून उठल्यावर चणे आणि काजू
  • संध्याकाळी ब्रेकनंतर नारळ पाणी आणि जिलेबी, लाडू
  • रात्री जेवणात डाळ भात, बटाटा, चणा आणि पनीर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा