SHARE

काही कलाकार रंगभूमीवरच जास्त रमतात... इथंच नावारूपाला येतात आणि लोकप्रियही होतात... प्रदीप पटवर्धन हेदेखील रंगभूमीवरील एक असेच कलाकार आहेत. कधी हसवणारे, तर कधी रडवणारे पटवर्धन आता स्त्रियांच्या समस्येसाठी ‘पळापळ’ करताना दिसणार आहेत.

राजेश कोळंबकर लिखित आणि अक्षय अहिरे दिग्दर्शित ‘आली तर पळापळ’ हे नाटक मागील काही दिवसांपासून रंगभूमीवर सुरू आहे. स्त्रियांच्या समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या माई प्रॅाडक्शन आणि स्मितहरी प्रॅाडक्शन निर्मित या नाटकात आता प्रदीप पटवर्धन यांची एंट्री झाल्याने एक नवा जोश निर्माण झाला आहे. समाजातील सद्यस्थितीवर नजर टाकत अनोख्या शैलीत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या नाटकाच्या निमित्ताने पटवर्धन यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत केली.


ज्वलंत प्रश्नावर आधारित

आज स्त्रियांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सामाजिक जीवनातील एक समस्या फार वेगळी आहे, ज्याकडे कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही. याबद्दल चर्चा करतानाही ती दबक्या आवाजात केली जाते. ही समस्या आहे स्वच्छतागृहांची. आज ठिकठिकाणी जरी सार्वजनिक शौचालयं उभारण्यात अाली तरी अद्याप तिथल्या स्वच्छतेचा प्रश्न सुटलेलाच नाही.


धाडसी प्रयत्न

‘आली तर पळापळ’ या नाटकाद्वारे लेखक-दिग्दर्शकाने एक धाडसी प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. या जर माध्यमांद्वारे समाजासमोर आणल्या गेल्या, तर त्या लवकर सुटण्यास मदत होते. जनजागृतीही जलदगतीने होते. ‘आली तर पळापळ’ हे नाटक तेच काम करणार आहे.


आरोग्यावर परिणाम होतो

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा स्त्रिया नैसर्गिक क्रिया थोपवून धरतात. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. किडनीसारख्या विकारांना त्यांना सामोरं जावं लागतं. गरोदर स्त्रिया जर गलिच्छ स्वच्छतागृहात गेल्या, तर अर्भकावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भावी पिढी सुदृढ उपजणार नाही. असे बरेच मुद्दे या नाटकाच्या निमित्ताने मांडण्यात आले आहेत.


सुत्रधाराच्या भूमिकेत

विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जाणारे प्रदीप पटवर्धन या नाटकात सुत्रधाराच्या भूमिकेत आहेत. यातील राजा-प्रधानाच्या एका दृश्यामध्ये ते राजाही बनले आहेत. प्रजेच्या आरोग्याबाबत सजग असलेला हा राजा त्यांच्या सुखसोयींसाठीही कटिबद्ध आहे. या नाटकाच्या माध्यमातून विनोदी शैलीत एक अतिशय महत्त्वाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


कटू सत्य

अशा प्रकारची नाटकं रंगभूमीवर यायलाच हवीत. यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे. कोळंबकर आणि अहिरे यांनी ‘आली तर पळापळ’ च्या निमित्ताने एक वेगळा विचार मांडला आहे. हे नाटक जरी सत्य अधोरेखित करणारं असलं, तरी यात कुठेही अश्लिलतेचा लवलेषही नाही. वास्तव दाखवणारं असलं, तरी कमरेखालचे विनोद करणारं नाही.


चांगल्या टीमसोबत काम

पटवर्धन यांची एंट्री होण्यापूर्वीपासून दिपा माळकर, स्नेहा पराडकर, प्रियांका सातपुते, रंजना म्हाब्दी, सुशील पवार, सचिन वळंजू, नितीन जंगम, सुरेश तांबे हे या नाटकात अभिनय करत आहेत. योगेश लोहकरे यांची प्रस्तुती असलेल्या या नाटकाची निर्मिती स्मिता हरी पाटणकर, पप्पी वाडीभस्मे आणि चंद्रकांत सुरकर यांनी केली आहे. सचिन गोताड यांचं नेपथ्य आहे.  तर प्रवीण डोणे यांनी संगीत दिलं आहे.हेही वाचा -

तीन दशकांनंतर पुन्हा ‘मामला चोरीचा’संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ