Advertisement

जेष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचं निधन


जेष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचं निधन
SHARES

बालरंगभूमीसाठी अविरत काम करणाऱ्या जेष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर (८३) यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे सोमवारी सकाळी निधन झालं. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर बालरंगभूमीची सेवा केली. याचबरोबर 'लिटील थिएटर' या बालरंगभूमीच्या चळवळीचीही स्थापना केली. या कार्यात त्यांच्याबरोबर अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक विजय केंकरे यांची साथ त्यांना मिळाली. प्रामुख्याने अाविष्कार आणि छबिलदासमध्ये त्यांनी बालरंगभूमीसाठी मोठं काम केलं. नाट्य शिक्षण घेण्यासाठी त्या परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन बालरंगभूमीचा अभ्यास केला. आणि भारतात परत आल्यावर 'लिटील थिएटर'ची स्थापना केली.



नृत्यातही होत्या पारंगत

त्या नाटकाबरोबरच नृत्यातही पारंगत होत्या. भरतनाट्यम हा नृत्यप्रकारही त्या शिकल्या. मो. ग. रांगणेकरांच्या 'रंभा' या पुनर्जन्मावर आधारित नाटकात त्यांनी नृत्यांगणेची भूमिका साकारली होती.


असा झाला बालनाट्य संकल्पेचा उदय 

१९५९ साली पहिल्यांदा रंगभूमीवर बालनाट्य या संकल्पनेचा उदय झाला. सुधा करमरकर यांनी आपल्या पहिल्यावहिल्या 'मधुमंजिरी' बालनाट्यात चेटकिणीची भूमिका केली आणि ती खूप गाजलीही. या नाटकाचं लेखन रत्नाकर मतकरी यांनी केलं होतं. तर सुधा करमकर यांचे वडील तात्या अमोणकर यांच्या 'साहित्य संघ' या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली होती.

सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यातून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच, पण मुलांचे नाटक कसे असावे? याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला.



सुधाताईंच्या गाजलेल्या भूमिका

  • अनुराधा - विकत घेतला न्याय
  • उमा - थँक यू मिस्टर ग्लॅड
  • ऊर्मिला - पुत्रकामेष्टी
  • कुंती - तो राजहंस एक
  • गीता - तुझे आहे तुजपाशी
  • चेटकीण - बालनाट्य-मधुमंजिरी - इ. स.१९५९
  • जाई - कालचक्र
  • दादी - पहेला प्यार - हिंदी दूरदर्शनमालिका - इ. स.१९९७
  • दुर्गाकाकू - भाऊबंदकी
  • दुर्गी - दुर्गी
  • धनवंती - बेईमान
  • बाईसाहेब - बाईसाहेब
  • मधुराणी - आनंद
  • मामी - माझा खेळ मांडू दे
  • यशोधरा - मला काही सांगायचंय
  • येसूबाई - रायगडाला जेव्हा जाग येते
  • रंभा - रंभा
  • राणी लक्ष्मीबाई - वीज म्हणाली धरतीला
  • सुमित्रा - अश्रूंची झाली फुले
  • पती गेले गं काठेवाडी
  • उद्याचा संसार


सादर केलेली बालनाट्य

  • चिनी बदाम
  • रत्‍नाकर मतकरी - कळलाव्या कांद्याची कहाणी - मधुमंजिरी
  • दिनकर देशपांडे - हं हं आणि हं हं हं
  • गणपती बाप्पा मोरया
  • अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, जादूचा वेल
  • अलिबाबा आणि चाळीस चोर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा