Advertisement

जागतिक रंगभूमी दिन: 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नावाचं 'सौंदर्यशास्त्र'

कला ही माणसाला समृद्ध करते. मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद कलेतच असल्याचं म्हटलं जातं. हाच विश्वास मनात ठेवून २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' या तत्वज्ञानाचे 'अभ्यासक कलाकार' ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात 'कलात्मक नाट्य महोत्सव' घेऊन आले आहेत!

जागतिक रंगभूमी दिन: 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नावाचं 'सौंदर्यशास्त्र'
SHARES

कला ही माणसाला समृद्ध करते. मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद कलेतच असल्याचं म्हटलं जातं. हाच विश्वास मनात ठेवून २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' या तत्वज्ञानाचे 'अभ्यासक कलाकार' ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात 'कलात्मक नाट्य महोत्सव' घेऊन आले आहेत!

२७ मार्च ते २९ मार्च दररोज सकाळी ११.३० वाजता रंगणाऱ्या या नाट्य महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण महोत्सव जन सहयोगाने उभा राहिलेला आहे! कलाकाराची ताकद म्हणजे त्याचे हक्काचे प्रेक्षक! याच महोत्सवातल्या 'अनहद नाद' या नाटकातील सशक्तपणा नाटकातील सहभागी कलाकाराने आपल्यापुढे मांडला आहे.



अनोखी दृष्टी

खरंतर 'अनहद नाद' हे निमित्तमात्र नाही, तर अनेक निमित्तांना निर्माण करणारं नाटक आहे. या नाटकाच्या माध्यमातून 'सौंदर्यशास्त्रा'त डोकावण्याची दृष्टी मला या 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'च्या प्रक्रियेने मिळवून दिली. कारण सौंदर्यशास्त्र हा शब्दही माझ्या कधी ऐकिवात नव्हता.

सौंदर्य म्हणजे सुंदरता दिसणे, भावणे. पण, याच्याही पलीकडे असं सौंदर्य असतं जे आपल्याला साऱ्या चौकटी मोडत खऱ्याखुऱ्या सुंदरतेच्या पलीकडे नेतं. तुमच्या मनाला भिडतं, रोमारोमात फुलत जातं. ते पाहता तुमच्या मुखातून विनाविलंब शब्द स्फुटीत होतो वाह! सुंदर!!



क्षणाक्षणाला बदलणारं आवर्तन

मी जेव्हा या नाटकात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा यातील सौंदर्याची मला जाणीव झाली नाही. पण, आजच्या घडीला या प्रक्रियेत क्षणाक्षणाला बदलणारं आवर्तन, एक फाॅर्मेशन बघण्याची दृष्टी मला गवसली आहे. ही अनोखी दृष्टी माझ्यासारख्या कलाकाराला उन्मुक्त होण्याची जणू संधीच मिळवून देते.

आजच्या युगात सौंदर्य वस्तूंमध्ये शोधलं जातं. वस्तूने बाह्य सौंदर्य सजवलं जातं.. पण, 'अनहद नाद' या नाटकाचं सौंदर्य मानवी प्रक्रिया आणि कलाकाराच्या उन्मुक्ततेचं सौंदर्य आहे... हे सौंदर्य केवळ दिसत नाही, तर मनाला भिडत जातं आणि प्रेक्षक या प्रक्रियेचा एक भाग बनत जातो.



वस्तूकरणाचा बाजार

आज विकासाच्या अंदाधुंदीत वस्तूकरणाच्या बाजारात मनुष्यालाही वस्तू बनवणारी कुरूपता फोफावत चालली आहे. जिथं पाहावं तिथे वस्तूंची देवाणघेवाण आणि बाजारीकरण सुरू आहे. यांत निसर्ग, ब्रम्हांड, झाडे, पक्षी, पंचतत्वाने निर्मित झालेल्या निसर्गाची सुंदरता हरवत चालली आहे. खुद्द 'मनुष्य' देखील वस्तू बनत चालला आहे,

पण, 'अनहद नाद' या वस्तूकरणाला झिडकारतो, विरोध करतो. निसर्गाच्या सौंदर्याला मानवी मूल्यांच्या आकारातून साकार करतो इथं मानवच निसर्ग बनतो आणि नाटकाला ही नैसर्गिक बनवतो... इथं मानवच विचार बनतो आणि विचारांचं सौंदर्य प्रत्येक संवादाला वैचारिक बनवतं. माणसाचा माणूस असण्याचा, माणूस बनून राहण्याचा हा सुंदर प्रवास... कलेचा माणसाला सात्विक बनवण्याचा कलात्मक प्रवास ही याची विशेष सुंदरता आहे...


शब्द, कर्म एक

माणसाला वस्तू नका समजू, तो जीवित आहे, खळाळता झरा आहे, हे पटवून देणारी दृष्टी या नाटकात आहे. या नाटकाच्या फॉर्मेशनमध्ये निसर्ग जिवंत होताना दिसतो. शरीर गायब होतात आणि विचार स्पष्ट होतात. माणसाचे शब्द आणि माणसाचे कर्म एक होताना दिसतात. कलाकाराची ताकद याही पलिकडे एका व्यक्तीची ताकद किती सुंदर असते हे जाणवतं.

क्षणभरात नदीचा प्रवाह तर दुसऱ्या क्षणी बस, रेल्वेतील गर्दी. क्षणात उगवणारा सूर्य तर कधी ब्रम्हांडात फिरणारे ग्रह. हिमालयाचे गोठवणारे टोक तर कधी जळत्या चितेत जळणारी मी असे एकाहून एक सुंदर मानवी आकृत्या, चित्र स्पष्ट करत जातात आणि या फ्रेम्स मागे असलेला वैचारिक प्रवाह, आत्मिक संवाद अधिकाधिक स्पष्ट होत जातो.

- अश्विनी नांदेडकर, कलाकार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा