Advertisement

1 ऑगस्टपासून यशवंत नाट्यमंदिर खुले होणार

प्रशांत दामले यांच्या नाटकापासून यशवंत नाट्यमंदिर सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

1 ऑगस्टपासून यशवंत नाट्यमंदिर खुले होणार
SHARES

तीन वर्ष नाट्य प्रयोगांसाठी बंद असलेले यशवंत नाट्यमंदिर १ ऑगस्टपासून रसिकांच्या सेवेला रुजू होत आहे. गेले दोन महिने नूतनीकरण सुरू असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी आणि प्रेक्षकांना नाटके पाहण्यासाठी सज्ज झाली आहे.

यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहाच्या व्यवस्थापकपदी दीपक सावंत यांची नेमणूक झाली असून नाट्य निर्मात्यांनी त्यांच्या नाट्य संस्थांच्या प्रयोगासाठी त्यांच्याकडे रितसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्य निर्मात्यांना केले आहे .

१४ जून रोजी गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यशवंत नाट्य मंदिर नाट्यगृहाचे औपचारिक उद्घाटन केले होते. पण थोडे अंतर्गत काम बाकी असल्यामुळे नाट्यगृह प्रयोगांसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते.

आता अद्ययावत सोयीसुविधा तसेच तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले निवडून आल्यानंतर नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसेच विश्वस्त मंडळ यांनी यशवंतराव नाट्य संकुल लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले.

याच प्रयत्नामुळे ते १ ऑगस्टपासून सज्ज होत आहे. नव्याने दिमाखात सुरू झालेले हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रशांत दामले यांनी दिले आहे. प्रशांत दामले यांच्या नाटकापासून यशवंत नाट्यमंदिर सुरू होणार असल्याची चर्चा आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा