Advertisement

२८ टक्के महागाई भत्ता देण्याच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आलं.

२८ टक्के महागाई भत्ता देण्याच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
SHARES

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आलं. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्यानं एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीनं हा निर्णय घेतला. मात्र, उपोषणाचे रूपांतर अघोषित संपात झाल्यानं गुरुवारी एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं राज्यातील २५० पैकी १९० आगार पूर्णत: बंद झाले होते. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडलं होतं. एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यात एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के  महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यामुळं आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले.

एसटी महामंडळानं कामगारांच्या महागाई भत्त्यात नुकतीच ५ टक्के  वाढ केली होती. त्यामुळं महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के  झाला. परंतु, ही वाढ फक्त ५०० ते ६०० रुपयांचीच होती. त्यातच कर्मचाऱ्यांसाठी २५०० रुपये दिवाळी भेटची घोषणा करण्यात आली तरी घरभाडे भत्त्यासह अन्य आर्थिक लाभांवर महामंडळाने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळं बुधवारपासून एसटी महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यासंदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याशी संघटनांची झालेली चर्चाही फिसकटली होती.

गुरुवारी या आंदोलनाला अघोषित संपाचे स्वरूप आले. राज्यातील एसटी कामगार मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गुरुवारी सकाळपासून एसटी सेवा ठप्प होण्यास सुरुवात झाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना त्याचा फटका बसला. दिवाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी एसटीचे आरक्षण के लेल्या प्रवाशांनाही मनस्ताप झाला.

सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील २५० आगारांपैकी १०० एसटी आगार बंद झाले. दुपारनंतर ही संख्या १९० पर्यंत गेली, तर ७२ आगार अंशत: सुरू होते. मुंबई, नागपूर, भंडारा, गडचिरोली विभागात काही प्रमाणात एसटी धावत होत्या. मात्र, त्यांची संख्या कमी होती. परिणामी प्रचंड गर्दी झाली होती.

एसटी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न महामंडळाकडून सुरु होते. परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळ अधिकारी व एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीशी चर्चा सुरु होती. अखेर गुरुवारी रात्री यावर तोडगा निघाला. एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के  महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

अन्य मागण्यांवर दिवाळीनंतर तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही दिले. त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने संप मागे घेतला. शुक्र वारी एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती महामंडळाने दिली.

मुंबई, ठाणे व महानगरातील अन्य भागांत गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत काही प्रमाणात एसटी सेवा सुरू होती. त्यानंतर या आंदोलनाचा मुंबई महानगरातही परिणाम जाणवू लागला. एक लसमात्रारकांना लोकल प्रवासास परवानगी नसल्याने आणि एसटीही बंद झाल्याने प्रवाशांपुढे अन्य परिवहन सेवांशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे पालिकांच्या परिवहन सेवांच्या थांब्यावर मोठी गर्दी होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा