Advertisement

ताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या

अधिकाधिक वाहनचालकांना पक्के लायसन्स चाचणीसाठी लवकर वेळ मिळावी यासाठी त्याच्या राखीव कोट्यात आणि वेळेत वाढ करण्याचा निर्णय ताडदेव आरटीओ कार्यालयाने घेतला आहे.

ताडदेव आरटीओत दिवसाला ९०३ जणांच्या चाचण्या
SHARES

अधिकाधिक वाहनचालकांना पक्के लायसन्स चाचणीसाठी लवकर वेळ मिळावी यासाठी त्याच्या राखीव कोट्यात आणि वेळेत वाढ करण्याचा निर्णय ताडदेव आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. आधी दिवसाला ६३० जणांना चाचणीसाठी बोलावण्यात येत होते. आता ९०३ जणांना चाचणीची वेळ देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी २४ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्के लायसन्स चाचणी करणारे ताडदेव कार्यालय हे राज्यातील पहिले आरटीओ कार्यालय ठरले आहे. ताडदेव आरटीओमध्ये लायसन्स चाचणी घेण्यासाठी दोन साहाय्यक निरीक्षक होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आता आणखी ८ निरीक्षकांची या कामासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळं पक्के लायसन्स चाचणीच्या कामाला गती मिळावी, चालकांनाही लायसन्ससाठी त्वरित वेळ मिळावी म्हणून चाचणीची वेळ आणि उमेदवारांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती मिळते.

परिवहनच्या संकेतस्थळावर नवीन चाचणी कोटा आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पक्के लायसन्स चाचणीकरिता त्याच्या वेळेतही वाढ करण्यात आली असून कार्यालयीन वेळेआधी म्हणजेच सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाचणी होईल. पूर्वी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चाचणी करण्यात येत होती.

परिवहनच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर झालेल्या अर्जाचा प्राधान्याने स्वीकार केला जातो. ठरावीक कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसांकरिता ऑनलाइन चाचणी आरक्षण बंद होते. पक्के लायसन्स चाचणीच्या वेळेकरिता अर्जदारांनी सकाळी १० वाजता ऑनलाइन प्रक्रिया करावी.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा