Advertisement

लोकलचे धक्के खाऊन कंटाळलात, तयार राहा जलवाहतुकीच्या नव्या पर्यायासाठी

भारताला १११ नद्या आणि ७५०० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याचाच वापर जलवाहतुकीसाठी करून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा केंद्रीय जल वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. कॅनडा, अमेरिका आणि युरोप या देशांत अशा प्रकारे जलवाहतुकीचे मार्ग तयार केले जात आहेत. त्याचपद्धतीचा अभ्यास करून मुंबईसह देशात या जलवाहतुकीचा पर्याय हळुहळू प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लोकलचे धक्के खाऊन कंटाळलात, तयार राहा जलवाहतुकीच्या नव्या पर्यायासाठी
SHARES

ग्रामीण भागात रोजगार कमी असल्यामुळे अनेक जण नोकरीच्या शोधात मुंबईकडे आकर्षित होतात. त्यातच मुंबईतला प्रवास म्हणजे तारेवरची कसरत. सकाळ असो वा संध्याकाळ लोकलने प्रवास करताना गर्दीचा, तर बस, टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करताना वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. यामुळे प्रवासादरम्यान मुंबईकरांची घुसमट होते. परिणामी रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. प्रवाशांचा प्रवास अधित सुखकर करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय समोर आला. त्यामुळे आता जलवाहतुकीचे नवे पर्याय प्रवाशांच्या सुविधेसाठी सादर करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारनं कंबर कसली आहे.

भारताला १११ नद्या आणि ७५०० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याचाच वापर जलवाहतुकीसाठी करून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा केंद्रीय जल वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. कॅनडा, अमेरिका आणि युरोप या देशांत अशा प्रकारे जलवाहतुकीचे मार्ग तयार केले जात आहेत. त्याचपद्धतीचा अभ्यास करून मुंबईसह देशात या जलवाहतुकीचा पर्याय हळुहळू प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.



रोरो सेवा (भाऊचा धक्का ते मांडवा)

लोकल आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासोबतच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रोरो (रोल ऑन रोल ऑफ) म्हणजेच प्रवासी आणि वाहने वाहून नेणारी सेवा सुरू करण्यात येईल. रोरो ही योजना २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या सेवेमुळे ३ तासांचा रस्ता १५ ते १७ मिनिटांत पार करता येईल. या योजनेसाठी तब्बल १३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या सेवेमुळे मुंबई येथे मालवाहतूक, पर्यटन या क्षेत्रांचाही विकास होणार आहे.



रोरो सेवा आणखी कुठे

नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया यानंतर बोरीवली ते गोराई फेरी यासह राज्यातील ५२ समुद्रमार्गांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या ३० समुद्री मार्गांवर जलवाहतुकीची सेवा सुरू करण्याचं काम सुरू आहे. गोराई, मालवण, भाइंदर येथेही जेट्टींना मंजुरी देण्यात आली आहे.


'सागरमाला' योजना

गोव्याला जाण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई मार्गासोबत आता आणखी एक नव्या मार्गाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 'सागरमाला' योजनेअंतर्गत मुंबई-गोवा फेरी बोट सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. या फेरी बोटने वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरीपर्यंत जलप्रवास करणे शक्य आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना या फेरीचा अधिक फायदा होत आहे. या योजनेसाठी २ लाख १७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला.


मुंबई-बँकॉक क्रूझ सफर

मुंबई ते बँकॉकपर्यंत मजेशीर सफर करायची असेल तर ते आता शक्य होणार आहे. कारण वाइकिंग्स ओशियन क्रूझ, मुंबईमधून दोन नव्या सेवा सुरू करणार आहे. यात मुंबई ते बँकॉक आणि ग्रीसमधल्या अथेंस शहराला भेट देता येणार आहे. मुंबई ते बँकॉक ही क्रूझ सेवा ८ सप्टेंबर २൦१८ ला सुरू होईल. तर अथेंस ते मुंबई ही क्रूझ सेवा १९ ऑगस्ट २०१८ ला सुरू होईल. या क्रूझमुळे अथेंसवरून २१ दिवसांत मुंबई गाठता येईल. या अंतर्गत ६ देशांना भेटी देती येतील. प्रवासादरम्यान प्राचीन शहर, प्राचीन बंदर आणि पिरॅमिड याबद्दल प्रवाशांना माहिती देण्यात येईल. या क्रूझनं १६ दिवसांमध्ये बँकॉकला पोहोचणं शक्य होणार आहे. या अंतर्गत पर्यटकांना ५ देशांना भेटी देता येतील. १६ दिवसांत ही क्रूझ गोवा, कोलंबो, क्वालालंपूर, सिंगापूर या देशांना भेट देत बँकॉकला पोहोचणार आहे. क्रूझने येणाऱ्या परदेशी नागरिकाच्या पर्यटनाची सुरुवात मुंबईपासूनच होणार आहे. या प्रवाशांना दक्षिण मुंबईसह उत्तर मुंबई फिरवण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.



सी प्लेन

डिसेंबर महिन्यात देशातल्या पहिल्यावहिल्या सी प्लेनची चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या सी प्लेनचं लँडिंग जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी करता येतं. आता २०१८ मध्ये मुंबईकरांसाठी ही सी प्लेन सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. किमान १० ते १४ प्रवासी बसू शकतील एवढ्या क्षमतेची ही सी प्लेन असून तब्बल १०० सी प्लेन सुरु करण्याचा स्पाईसजेट या विमान कंपनीचा विचार आहे. महत्त्वाचं म्हणजे सामान्यांना परवडेल इतकीच तिकीटाची किंमत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा मुंबई ते पुणे (लोणावळा) चालवण्याचा सरकारचा विचार आहे. अशी जलवाहतूक सेवा सध्या युरोप, अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशात सुरू आहे.



गिरगाव चौपाटीवर जेट्टी उभारणार

गिरगाव चौपाटीवर जेट्टी उभारण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मास्टर प्लान तयार केला आहे. ही जेट्टी मरीन ड्राइव्ह या मार्गाला जोडण्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्राची मोकळी जागा सरकार ताब्यात घेणार अाहे. ही जागा प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी, टर्मिनस इमारत, प्रसाधनगृह, भांडारकक्ष, उपहारगृह अाणि हाॅटेलसाठी वापरण्यात येणार आहे. पण मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत अालेल्या या प्रस्तावाला अद्याप रोखून ठेवण्यात आलं आहे.

निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रवास करता यावं मुंबईकरांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. येत्या काळात जलवाहतुकीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी देशातील छोट्या बंदरांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दीष्ट्य आहे.

जलवाहतुकीप्रमाणेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या विकासाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. कारण एकीकडे राज्यासह मुंबईतले रस्ते खड्डेमय झाले आहेत. रेल्वेतून प्रवास करतानाही प्रवाशांची दमछाक होते आहे. आज रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची जी दुर्दशा झाली आहे, तीच दुर्दशा आता जलवाहतुकीची तर होणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा