मुंबई (mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. नुकतीच मेट्रो 3 (metro 3) अॅक्वा लाईन सुरू झाली आहे.
लवकरच मेट्रो 8 देखील धावणार आहे. दहिसर (dahisar) ते काशिमिरा (kashimira) दरम्यानचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
याच वाढत्या नेटवर्कमध्ये आता आणखी एका मेट्रोची भर पडत आहे. राज्य सरकारने मेट्रो 11 ला मंजुरी देत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मेट्रो 11 ही गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा (wadala) असा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 23,487.51 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये मार्गिकेचा विस्तार, मेट्रो डेपो निर्माण आणि इतर संबंधित कामांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रो 4/4A (वडाळा–कासारवडवली–गायमुख) या मार्गिकेचा विस्तार करून वडाळ्यापासून गेटवेपर्यंत जोडणी करण्यात येणार आहे.
हा मार्ग एकूण 14.51 किमी लांबीचा आहे. त्यावर 14 स्थानके असतील. यापैकी 13 स्थानके भूमिगत तर 1 स्थानक अॅट-ग्रेड असेल. हे काम राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण होणार आहे.
ही मार्गिका वडाळा–शिवडी–फिरोजशाह मेहता रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–काळा घोडा मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल.
मेट्रो 11 कार्यान्वित झाल्यानंतर दक्षिण मुंबईत (mumbai) प्रवास करणे अधिक सोपे आणि जलद होईल. सध्या मेट्रो 4/4A चे काम अंतिम टप्प्यात आहे.
याचा विस्तार मंजूर झाल्यामुळे पुढील काही वर्षांत शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई लोकलवरील भारही लक्षणीय कमी होऊ शकतो.
सध्या मुंबईत 89 किमी मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. भविष्यात हे जाळे 337 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकूण 16 मेट्रो मार्गिका उभारण्याचा आराखडा आहे. यामुळे मुंबईचा संपूर्ण वाहतूक अनुभव ‘स्मार्ट’ आणि आधुनिक होणार आहे.
हेही वाचा
