Advertisement

कोरोनामुळं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार

मध्य रेल्वेनंही असाच काहीसा प्रयोग सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनामुळं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी महापालिकेकडून घेतली जात आहे. अशातच मुंबई लोकल सेवा कर्मचारी वर्गासाठी सुरू झाली असून, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा व्यवस्थेत गैरसोय होऊ नये यासाठी विषेश काळजी घेतली जात आहे. शिवाय, लोकल सुरू केल्यानं आपोआप प्रवाशी संख्याही वाढली आहे. त्यामुळं कोरोनाचा धोका लक्षात घेत गर्दी नियंत्रणाबरोबरच प्रवाशांना शिस्त लागावी, यासाठी मेट्रो रेल्वे स्थानकांप्रमाणेच रेल्वे स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वाराचा (फ्लॅप गेट) प्रयोग करण्याचा विचार असून सीएसएमटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर हे प्रवेशद्वार तयार केलं जाणार आहे.

मुंबई मेट्रो स्थानकांत स्वयंचलित प्रवेशद्वार आहेत. प्लास्टिकच्या नाणेसदृश तिकिटाआधारे हे प्रवेशद्वार प्रवाशाकरिता खुले होते. त्यामुळं मध्य रेल्वेनंही असाच काहीसा प्रयोग सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्टोबर २०२० मध्ये स्वयंचलित प्रवेशद्वार बसवण्यात आले. यामध्ये क्यूआर कोड स्कॅनर आणि थर्मल स्कॅनिंगही होते.

प्रवेशासाठी प्रवाशांना क्यूआर कोड असलेलं तिकीट प्रवेशद्वारावरील क्यूआर कोड स्कॅनरसमोर दाखवावं लागतं. तिकीट तपशील आणि तापमान तपासणी केल्यानंतर प्रवेश मिळतो. टर्मिनसवरील प्रयोगानंतर सीएसएमटी उपनगरीय स्थानकातही हाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावर हा प्रयोग यशस्वी होईल, याची चाचपणी सुरू आहे.

मेल-एक्स्प्रेस स्थानकात बसवण्यात आलेल्या स्वयंचलित प्रवेशद्वारामुळे काही तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. उदाहरणार्थ प्रवेशद्वार उघड-बंद होण्यास थोडा वेळ लागतो. या समस्या दूर करता येतील तसेच उपनगरीय मार्गावर हा प्रयोग यशस्वी ठरेल का, हे तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे. उपनगरीय स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं या प्रयोगाबाबत रेल्वे सावध भूमिका घेत आहे.

साधारण जानेवारीनंतर या प्रयोगाला सुरुवात होणार असल्याचं समजतं. उपनगरीय प्रवाशांनाही देण्यात येणाऱ्या लोकल प्रवासावरील तिकीट व पासावर क्यूआर कोड दिलं जाणार आहे. त्यानंतर प्रवेशद्वारातून बाहेर जाताना किंवा प्रवेश करताना तिकिटावरील क्यूआर कोडचा वापर करावा लागेल, अशी त्यामागील संकल्पना आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा