Advertisement

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ अटळ?

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागणीनुसार भाडेवाढ झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ अटळ?
SHARES

कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात झालेला तोटा आणि मागील अनेक वर्षांपासून न झालेली भाडेवाढ यामुळं रिक्षा व टॅक्सी चालकांनी परिवहन मंत्र्यांकडं भाडेवाडीची मागणी केली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागणीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत विचार केला जाईल, असं आश्वासन संघटनांना दिलं.

रिक्षाचं सध्याचं भाडं १८ रुपये आणि टॅक्सीचं २२ रुपये भाडं आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळं २१ रुपयांवरून भाडं २२ रुपये झालं होतं. तर याच वर्षांत रिक्षाच्याही भाडेदरात १ रुपयांची वाढ झाली होती. ही भाढेवाढ हकिम समितीनुसार प्रत्येक वर्षी दिली जात होती. परंतु, या समितीच्या सूचना प्रवाशांच्याही हिताच्या नसल्यानं त्याविरोधात प्रवासी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यानंतर एकसदस्यीय खटुआ समितीची शिफारस करण्यात आली, परंतु रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरावर मात्र काही निर्णय झाला नाही.

रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीसंदर्भात सातत्यानं परिवहन विभागाकडं पत्रव्यवहार करतानाच परिवहनमंत्री, सचिव, परिवहन आयुक्तांच्या भेटीगाठीही घेतल्या. अखेर यावर विचार केला जात असल्याचं परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी रिक्षा परवाने खुले केले. त्यामुळे रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी वाहतूक कोंडीही होऊ लागली. काहींनी नुसतेच परवानेदेखील घेऊनही ठेवले. त्यामुळं या परवान्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही संघटनांनी केली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागणीनुसार भाडेवाढ झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. कोरोनामुळं सध्या लोकल सेवा बंद असल्यानं सर्वसामान्य प्रवासी हे रिक्षा-टॅक्सीनं प्रवास करत आहेत. त्यामुळं ही भाडेवाढ या प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी असल्याचं काही प्रवाशांचं म्हणणं आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा