Advertisement

बेस्ट उपक्रमाचा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प

बेस्ट उपक्रमाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा २ हजार २३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केला.

बेस्ट उपक्रमाचा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प
SHARES

बेस्ट उपक्रमाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा २ हजार २३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केला. या अर्थसंकल्पात, बेस्टचा वीज विभाग १२६.०१ कोटी रुपये, तर परिवहन विभाग २११०.४७ कोटी रुपये तुटीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

दरम्यान, हा अर्थसंकल्प बेकायदेशीर आणि फसवा असल्यानं फेरविचारार्थ पाठविण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र, हा विरोध डावलून अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. आता यावर अंतिम निर्णय पालिका महासभेत घेण्यात येणार आहे.

बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी १ तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते, सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर, अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, मतदान घेत अर्थसंकल्प बहुमताने मंजूर केला. हा अर्थसंकल्प आता पालिका सभागृहात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा