Advertisement

लॉकडाऊनच्या काळात बेस्टला १ हजार २९ कोटींचा तोटा

लॉकडाऊन झाल्यानं बेस्टवरील आर्थिक संकट आणखी वाढलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात बेस्टला १ हजार २९ कोटींचा तोटा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं सर्व वाहतूक सेवा विशेष म्हणजे मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंद करण्यात आली. त्यामुळं बेस्ट उपक्रमानं आपली वाहतूक सेवा सुरू ठेवत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. तसंच, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ही कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालत वाहतूक सेवा दिली. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला मोठा तोटा झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षीच प्रवाशांची घटलेली संख्या भरून काढण्यासाठी तिकीट दरात कपात केली. मात्र, या वर्षी लॉकडाऊन झाल्यानं बेस्टवरील आर्थिक संकट आणखी वाढलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे १७१ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. तर, खर्च १ हजार २०१ कोटी ९१ लाख रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात बेस्टची तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची वित्तीय तुट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेले ७२० कोटींच्या अनुदानानंतरही उत्पन्न आणि खर्चात ३१२ कोटी ३७ लाख रुपयांची तफावत असल्यानं २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. महापालिकेकडून मिळालेल्या अनुदानापेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावर बेस्टचा खर्च झाला आहे.

या ८ महिन्यात वेतनावर बेस्टचं ७३६ कोटी ९ लाख रुपये खर्च झाले आहे. तोट्यात असलेल्या बेस्टला महापालिकेनं गेल्या काही वर्षात २ हजार ५०० कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. तर, आताही अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, बेस्टकडून या खर्चाचा तपशील सादर करण्याची मागणी स्थायी समितीनं केली आहे. त्यानुसार, बेस्टनं एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२० या ७ महिन्यातील खर्चाचा तपशील सादर केला आहे.

बेस्टचं उत्पन्न

बेस्टला प्रवासी वाहतुकीतून १६७ कोटी ९२ लाखांचं उत्पन्न मिळालं तर इतर मार्गातून ४ कोटीचे असे १७१ कोटी ९२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, महापालिकेकडून ७२० कोटी रुपयांचे अनुदान अशा पध्दतीने एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात बेस्टच्या खात्यात ८९१ कोटी ९२ लाख रुपये जमा झाले. ३१२ कोटी ३७ लाख तुट भरुन काढण्यासाठी बेस्टनं २०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे.

खर्च असा झाला

  • पगार, वेतन - ७३६ कोटी ९ लाख
  • इंधन, सीएनजी -१४७ कोटी ९२ लाख
  • प्रवासी कर, पोषण अधिभार, पथकर - ३ कोटी ५१ लाख
  • पुरवठादारांना प्रदान - ११५ कोटी ६० लाख
  • भाडेतत्वावरील बसेससाठी - ४५ कोटी ६७ लाख
  • महापालिका मालमत्ता कर - ७ कोटी ४९ लाख
  • सेवेतील आणि निवृत्त कर्मचाऱ्यांवरील इतर खर्च - ८२ कोटी ७१ लाख
  • कर्जाची परतफेड - ६२ कोटी ९१ लाख
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा