SHARE

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका हार्बर रेल्वे मार्गाला बसला आहे. दुपारी आंबेडकर अनुयायांनी चेंबूर आणि गोवंडी रेल्वे मार्गावर रेलो रोको करत रेल्वे मार्ग रोखून धरल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रवाशांचे हाल हाेत आहेत. हार्बर रेल्वे हळुहळू पूर्वपदावर येत असून ४ वाजून ४० मिनिटांनी वाहतूक सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. याशिवाय मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे. 

या आंदोलनादरम्यान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. स्पेशल रन ५२, मानखुर्द - पनवेल ३ अप, ३ डाऊन, वाशी-पनवेल अप १०, डाऊन १० आणि कुर्ला-सीएसटीएम अप १०, डाऊन १०, सीएसटीएम मेनलाईन आणि ट्रान्सहार्बर अप ३, डाऊन ३ या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.दुपारी १२.१० च्या दरम्यान आंबेडकरी अनुयायी चेंबूर रेल्वे मार्गावर उतरले आणि त्यांनी सीएसटी-बेलापूर-८ ही रेल्वे रोखून धरली. त्यानंतर येथे दगडफेकीचे तुरळक प्रकारही घडले. या रेल रोकोमुळे कुर्ला ते मानखुर्द वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परंतु सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यानची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. 

चेंबूर आणि मानखुर्द रेल्वे स्थानकात आंदोलकांनी रेलरोको केल्यामुळे काही काळ हार्बर रेल्वे ठप्प झाली. तर मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे सुरळीत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कुर्ला आणि मानखुर्द ते वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. 

- सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


दरम्यान देवनार पालिका वसाहतीत ३५७ क्रमांकाची बेस्ट बस जमावाकडून फोडण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मंगळवारच्या आंदोलनाचा परिणाम होताना दिसत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या