
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता प्रत्येक शुक्रवारी BKCमध्ये “पब्लिक ट्रान्सपोर्ट डे” पाळला जाणार आहे. या दिवशी खासगी वाहनांऐवजी लोकल, मेट्रो आणि बसचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश BKCमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळवणे हा आहे. हा कार्यक्रम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे.
BEST, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना आणि WRI India यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळत आहे. BKCमधील सुमारे 90 कंपन्या आणि संस्थांनी या उपक्रमाला आधीच पाठिंबा दर्शवला आहे.
सर्वेक्षण आणि चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला. यात बहुसंख्य प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक अधिक विश्वासार्ह, सोयीस्कर आणि उत्तमरीत्या जोडलेली असल्यास त्याचा वापर करण्याची तयारी दर्शवली होती. BKCमार्गे मेट्रो-3 सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक खासगी वाहने, टॅक्सी आणि रिक्षांवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे.
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मेट्रो स्थानकांपासून कार्यालयांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी, फीडर बसची अपुरी संख्या आणि पादचारी सुविधांचा अभाव यामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतूक टाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या समस्यांवर उपाय म्हणून बस सेवांमध्ये सुधारणा, बससाठी स्वतंत्र वळण सुविधा, पादचारी मार्ग अधिक सोयीस्कर करणे तसेच सावलीयुक्त पदपथ उभारण्याचा विचार सुरू आहे.
पुढील तीन ते चार महिन्यांत या उपक्रमाचे बारकाईने निरीक्षण केले जाणार असून, नियमित आढावा घेऊन अडचणी ओळखून आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना आणि सार्वजनिक वाहतूक खर्चाची परतफेड यांसारख्या उपायांचाही विचार सुरू आहे.
हा उपक्रम यशस्वी ठरल्यास देशातील इतर व्यावसायिक केंद्रांसाठीही तो आदर्श मॉडेल ठरू शकतो. सार्वजनिक संस्था, वाहतूक यंत्रणा आणि खासगी कंपन्यांच्या समन्वयातून अधिक शाश्वत आणि कार्यक्षम शहरी वाहतूक व्यवस्था उभारता येऊ शकते, हे या उपक्रमातून दाखवून दिले जाऊ शकते.
हेही वाचा
