Advertisement

मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल


मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. याबाबत वारंवार महापालिकेनं जनजागृतीही केली आहे. मात्र, तरीही अद्याप अनेकजण मास्क न घालताच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळं महापालिका आशा नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करत आहेत. शिवाय या कारवाईतून महापालिकेनं आतापर्यंत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेनं मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ९ एप्रिलपासून मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीच्या काळात दंडाची रक्कम १ हजार रूपये इतकी होती. परंतु आता ती २०० रूपये करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ-१’मधील नरिमन पॉइंट, कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, पायधुनी, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, माझगाव या भागात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विभागांमध्ये २८ हजार २९२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसंच त्यांच्याकडून ६५ लाख ५६ हजार रूपयांचा दंड पालिकेनं वसूल केला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विविध स्तरावर कार्यवाहीदेखील सुरू आहे. दरम्यान, ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी यापूर्वी दिले होते. या अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश देण्यात आले होते.

सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षांदेखील याच आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देशही देण्यात आले असून सध्या सर्वत्र ही मोहीम राबवली जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा